Pimpri : क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय रे भाऊ?

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांना  शक्य तेवढे घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना बाधित व संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले जात आहे तर काहींना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. पण हे क्वारंटाईन, आयसोलेशन म्हणजे नक्की काय? कोणाला  क्वारंटाईन केलं जाते, त्याचे प्रकार किती, तसेच आयसोलेशन मध्ये कोण असतात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ काय व ते कसे अंमलात आणायचे, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

क्वारंटाईन – मराठीत सांगायचे तर विलगीकरण कक्ष. परदेशातून किंवा बाहेरच्या देशातून आलेले नागरिक ज्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असू शकते आशा नागरिकांना क्वारंटाईन केले जाते. यामध्ये दोन प्रकार असतात एक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आणि दुसरे होम क्वारंटाईन.

इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन– परदेशातून आलेल्या ज्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत त्यांना विमानतळावरतीच सरकारने नियोजित केलेल्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणतात. येथे त्यांच्यावर औषधे उपचार केले जातात व योग्य काळजी घेतली जाते. कोरोनाची लक्षणे दिसायला एक ते चौदा दिवसांचा कार्यकाळ लागू शकतो त्यामुळे त्यांना या ठिकाणीच क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जेवण व अन्य सुविधा सरकारकडून पुरवल्या जातात.

होम क्वारंटाईन– परदेशातून आलेल्या ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे दिसून अली नाहीत तरी हि लक्षणे दिसण्यासाठी एक ते चौदा दिवसांचा कालावधी लागू शकतो त्यामुळे त्यांना विमानतळावर क्वारंटाईन न करता घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येतो. यावेळेत त्यांनी नातेवाईक, मित्र व घरातील लोकांपासून दूर राहून स्वतःची काळजी घेणे अपेक्षित असते. तसेच या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईन चा शिक्का मारला जातो. अलीकडे बऱ्याच सिने कलाकारांनी स्वतःला होम क्वारंटाईन किंवा सेल्फ  क्वारंटाईन करूत घरात राहून दुसर्यांना पण घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

आयसोलेशन– बऱ्याच बातम्यांमधून तुम्ही ऐकले असेल अमुक जिल्ह्यामध्ये एवढ्या बेडचा आयसोलेशन वार्ड सज्ज करण्यात आला. आयसोलेशन म्हणजे सोप्या भाषेत अलगीकरण कक्ष. ज्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे किंवा ज्यांच्या कोरोना चाचणी च्या अहवालावर पॉझिटिव्ह असे नमूद केले आहे त्यांनाच फक्त आयसोलेशन किंवा अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. या रुग्णांपासून दुसऱ्या नागरिकांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या कक्षात डॉक्टर सोडून कुणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यांना योग्य उपचाराबरोबर औषधे, मास्क, जेवण, वायफाय सारख्या सुविधा पूवण्यात येतात.

सोशल डिस्टन्सिंग – कोरोना पासून बचाव करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या  प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्यात येत आहेत. शहरातील गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. बरेच कर्मचारी वर्क फ्रॉम होम चा पर्याय निवडत आहेत. या सर्वांमधून सोशल डिस्टंसिंग चा जास्त अवलंब करावा असे सामान्य नागरिकांपासून ते अगदी पंतप्रधानापर्यंत सर्वांनी सूचना केली आहे.

सोशल डिस्टंसिंग हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी किंवा बंद करण्यासाठीचा एक उपाय आहे. ज्यामध्ये लोकांबरोबर प्रत्यक्ष संपर्क टाळून स्वतःची काळजी घेतली जाते.  अनोळखी, आजारी व्यक्ती ते अगदी ओळखीच्या व्यक्तीपासून एक मीटरचे अंतर ठेऊन आपण आपला या आजारापासून बचाव करू शकतो. हा आजार कोरोना बाधित रूग्णाच्या तोंडातून व नाकातून उडणाऱया थेंबातून पसरत आसल्याने विषेश काळजी घेणे गरजेचे आहे.  लोकांपासून लोकांना  होणारा हा संसर्ग टाळण्यासाठी  शिंकताना, खोकताना तोंडाजवळ रुमाल धरणे, डोळे, नाकाला जास्त स्पर्श न करणे तसेच हात साबणाने वारंवार स्वच्छ करणे व गर्दीची ठिकाणे प्रकर्षाने टाळली पाहिजेत. त्यामुळे कोरोणा पासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंग हा उत्तम पर्याय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.