Pimpri: ‘कंटेनमेंट झोन’ कमी करण्याचे कारण काय? नागरिकांना सतावतोय प्रश्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील 21 दिवसांपासून दररोज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुग्ण वाढीची ‘गती’ कमी झाल्याचा दावा करत ‘कंटेनमेंट झोन’ कमी केले आहेत. कंटनमेंट झोन कमी करण्याचे आदेश काढताच सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. कंटेनमेंटमधून वगळण्यात आलेल्या पिंपरीगाव, काळेवाडी फाटा येथील रुग्णांचा समावेश होता. असे असतानाही आयुक्तांनी  ‘कंटेनमेंट झोन’ कमी करण्याची घाई का केली, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. दरम्यान, या निर्णयाची प्रमुख अधिकाऱ्यांना देखील माहिती नव्हती.

राज्यातील कोरोनाचे पहिले रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले होते. 10 मार्चला एकाचदिवशी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. यामुळे राज्याचे शहराकडे लक्ष लागले होते. रुग्णांची संख्या 12 पर्यंत गेली होती. तथापि, उपचार घेऊन पहिले 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. मात्र, त्यानंतर 8 एप्रिलपासून शहरात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील तीन दिवासत तर रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी आजच शंभरी ओलांडली आहे. शहर ‘रेडझोन’मध्ये गेले आहे.

कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (दि.19) मध्यरात्रीपासून सोमवार (दि. 27) मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण शहर सील करत ‘कंटेनमेंट’ झोन घोषित केले होते. या काळात देखील रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाले नाही. दररोज रुग्ण वाढत होते. देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्यामुळे ‘कंटेनमेंट झोन’ वाढविणे अपेक्षित होते. परंतु, असे असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोनाच्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचा दावा करत शहरातील केवळ 16 ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘कंटेनमेंट झोन’  कमी करण्याचा निर्णय घेताच सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामध्ये कंटेनमेंट झोनमधून वगळलेल्या पिंपरीगावातील चार, काळेवाडी फाटा येथील रुग्णांचा समावेश होता. काल 11 आणि आज मंगळवारी दहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ‘कंटेनमेंट झोन’ ची मुदत वाढविणे अपेक्षित असताना आयुक्तांनी अनपेक्षितपणे निर्बंध शिथिल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयुक्तांनी असा निर्णय नेमका कोणाच्या सल्ल्याने घेतला असा प्रश्न नागरिकांना सतावत  आहे. तसेच ‘कंटेनमेंट झोन’ कमी करण्याचा निर्णय घेतल्याने काही अधिका-यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, शेजारील पुणे महापालिकेने कंटनमेंट झोन कायम ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.