Pimpri News : पांढरे शुभ्र फुफ्फुसाचे बिलबोर्ड अवघ्या 22 दिवसात पडले काळे; हवेचा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

एमपीसी न्यूज – हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच हवेची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि परिसर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेले (Pimpri News) पांढरे शुभ्र फुफ्फुसाचे बिलबोर्ड (वायू गुणवत्ता दर्शक फलक) काळे पडले आहेत. 6 जानेवारी रोजी बसविण्यात आलेले हे बिलबोर्ड अवघ्या 22 दिवसात काळे पडल्याने शहरातील हवेची गुणवत्ता किती मोठ्या प्रमाणात ढासळत असल्याचे स्पष्ट होत आहे. हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे.
शहरातील एकूण प्रदूषणामध्ये हवेचे प्रदूषण वाढताना दिसत आहे. ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांत वाहनांची संख्या अफाट वाढली आहे व झाडांची संख्या कमी-कमी होत आहे. त्यावरुन हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहेत. हवेतील मुख्य व घातक प्रदूषके असलेल्या पीएम 2.5 आणि पीएम 10 मध्ये अनुक्रमे 70% आणि 61% एवढी मोठी वाढ मागील सहा वर्षांमध्ये झालेली आहे.
Pune News : मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध
आरोग्यासाठी महासंकट ठरणारी परिस्थिती आपल्या वातावरणात आहे. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. श्वसनमार्गाच्या आजारांप्रमाणे उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार आणि विविध प्रकारचे कर्करोग संभवतात. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कायमस्वरूपी असतात.
महापालिकेने हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच हवेची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पिंपरी चौकात वायू गुणवत्ता दर्शक फलक बसविले आहेत. 6 जानेवारी रोजी बसविलेले हे पांढरे शुभ्र गुणवत्ता दर्शक फलक अवघ्या 22 दिवसात काळे पडले आहेत.(Pimpri News) त्यावरून शहरातील हवा किती प्रदूषित आहे हे स्पष्ट होत आहे. हवेच्या गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांकडून करण्यात येत नाही.
काय आहे बिलबोर्ड?
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डमध्ये फुफ्फुसांची भव्य प्रतिकृती पांढऱ्या फिल्टरपासून बनवलेली आहे. आपल्या श्वासावाटे परिसरातील हवा शरीरातील फुफ्फुसांमध्ये जाते, त्याच प्रकारे या प्रतिकृतीच्या मागच्या बाजूला पंख्यांची जोडी लावली असून त्याद्वारे हवा आत खेचली जाते. पंख्यांच्या या हालचालींमुळे विविध स्रोतातून हवेत पसरणारे पार्टिक्युलेट मॅटर हे प्रदूषक या प्रतिकृतीमध्येही जाईल.
पुढील काही दिवसात वा आठवड्यात त्याचे परिणाम ठळकपणे दिसून येतील, म्हणजे फुफ्फुसाच्या प्रतिकृतीचा पांढरा रंग आधी तपकिरी व नंतर काळा होईल. परिसरातील हवेची गुणवत्ता त्या त्या वेळी कशी आहे हा ‘हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक’ दाखवणारा डिजिटल मॉनिटर या प्रतिकृतीसोबतच लावण्यात आलेला आहे. अवघ्या 22 दिवसात पांढरे शुभ्र फलक काळे पडल्याने शहरातील हवा किती प्रदूषित आहे हे स्पष्ट होत आहे.