Pimpri : वारिस खान पठाण यांना पंधरा कोटी मुस्लिम नागरिकांचा ठेका कोणी दिला? भाईजान काझी यांचा सवाल

एमपीसी न्यूज – वारिस खान पठाण यांनी बंगळुरु येथील सभेत केलेल्या वादग्रस्त विधानाचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध होत असताना हज यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष भाईजान काझी यांनी सुद्धा वारिस खान पठाण यांच्यावर टीका करत देशातील पंधरा कोटी मुस्लिम नागरिकांचा ठेका त्यांना कोणी दिला? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

पिंपरी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात भाईजान काझी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम धर्मियांची बैठक शनिवार (दि.22) आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

वारिस खान पठाण यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि तमाम देशवासीयांची जाहिर माफी मागावी. त्यांच्या या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव तीव्र निषेध करीत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया भाईजान काझी यांनी व्यक्त केली.

यावेळी काझी पुढे म्हणाले, बंगळूरु येथील सभेमध्ये देशविरोधी घोषणा देणा-या मुलीच्या हातातील माईक खासदार ओवेसी यांनी हिसकावून घेतला. परंतू माजी आमदार पठाण याला का थांबविले नाही? त्यांनी दोन धर्मांमध्ये वितुष्ठ, तेढ निर्माण करणारे निरर्थक वक्तव्य हे निव्वळ सवंग प्रसिध्दीसाठी केले आहे. भारतावर आतापर्यंत अनेक आक्रमणे झाली. पंरतू बहुभाषीक, बहुधार्मिक नागरिकांमध्ये नेहमी एकजूट राहिली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देशाचे अखंडत्व कायम राखण्यासाठी, समता, बंधूता वृध्दींगत करण्यासाठी देशातील तमाम हिंदू, मुस्लिम, शीख, बौध्द, ख्रिश्चन, पारशी या सर्व धर्मियांचे योगदान आहे.

दरम्यान वारिस खान पठाण यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले असून या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्व देशवासीयांची जाहिर माफी मागावी अशी मगणी या बैठकीत करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2
You might also like