_MPC_DIR_MPU_III

Pimpri : लक्ष्मणभाऊ की महेशदादा मंत्रिपदी कोणाची लागणार वर्णी ?

एमपीसी न्यूज – भाजपने चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ ताब्यात ठेवल्यानंतर यावेळी शहराला मंत्रीपद मिळणार का याची उत्सुकता लागली आहे. चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप तिस-यावेळी तर ‘कमळा’च्या चिन्हावर सलग दुस-यांदा निवडून आले आहेत. तर, भोसरीतून महेश लांडगे सलग दुस-यांदा निवडून आले असून यावेळी ‘कमळा’च्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

राज्यात सलग दुस-यावेळी महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुस-यावेळी भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यातून पर्वतीमधून माधुरी मिसाळ आणि चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हे सलग तिस-यांदा निवडून आले आहेत. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. मागील मंत्रीमंडळात पाटील दुस-या क्रमांकाचे मंत्री होते. पाटील यांची देखील मंत्रीमंडळात वर्णी निश्चित मानली जाते. मागील मंत्रीमंडळात अखेरच्या विस्तारात मावळचे बाळा भेगडे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. यावेळी त्यांचा पराभव झाला आहे.

पुणे जिल्ह्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहराला मंत्रीपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. महापालिकेत सत्ता येऊन तीन वर्ष झाले. तरी, मंत्रीपद काही मिळाले नव्हते.

आता लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दोघेही पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळी तरी जगताप किंवा लांडगे यांच्या रुपाने शहराला मंत्रीपद मिळते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.