Pimpri: पिंपरी कोणाचे चाबुकस्वार की बनसोडे?, चिंचवडमधून जगताप की कलाटे, भोसरीतून लांडगे की लांडे? उत्सुकता शिगेला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या तीनही विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेतात की राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरीचे शिलेदार होतात?, चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक करतात की अपक्ष राहुल कलाटे ‘मॅच विनर’ होतात?, भोसरीतून महेश लांडगे पुन्हा कुस्ती जिंकतात की विलास लांडे ‘कॅमबॅक’ करतात? याकडे शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 41 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि. 21) मतदानयंत्रात बंद झाले आहे. तीनही मतदारसंघातील ईव्हीएम (मतदान यंत्रे) बालेवाडी येथील क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. उद्या (गुरुवारी) बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांच्या नजरा उद्याकडे लागल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात दुरंगी लढत झाली. या दोघांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली आहे. पिंपरीत मागच्यापेक्षा 4 टक्के मतदान वाढले असून 50.27 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे चाबुकस्वार मतदारसंघ ताब्यात ठेवतात की बनसोडे पुन्हा पिंपरीचे शिलेदार होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवड मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण जगताप आणि सर्वपक्षीय अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत झाली आहे. भाजपसाठी एकतर्फी वाटणा-या चिंचवडमधील लढाईमध्ये शेवटच्या टप्प्यात कलाटे यांनी चूरस निर्माण केली. चिंचवडमध्ये जगताप यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. तर, चिंचवडमध्ये परिवर्तन होणार असल्याचा विश्वास कलाटे यांचा समर्थकांना आहे. त्यामुळे उद्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवडमध्ये 53.59 टक्के मतदान झाले असून मागीलवेळीपेक्षा तीन टक्के कमी मतदान झाले आहे.

भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आणि सर्वपक्षीय अपक्ष विलास लांडे यांच्यात काटे की टक्कर झाली आहे. दोनवेळा अपक्षांच्या बाजुने कौल देणारे भोसरीकर आता तिस-यावेळी कोणाला संधी देतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. भोसरीमध्ये 59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागीलवेळी पेक्षा दोन टक्क्यांनी मतदानामध्ये घसरण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.