Pimpri: महापौरपदी कोण होणार विराजमान? सोमवारी होणार फैसला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर, उपमहापौर पदासाठी येत्या सोमवारी (दि. 18) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने अर्ज भरल्यानंतर लगेच महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल. महापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. दरम्यान, महापौरपदासाठी आरती चोंधे, माई ढोरे, झामाबाई बारणे, माया बारणे, माधुरी कुलकर्णी, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, भीमाबाई फुगे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

शहराचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांची विधानसभा निवडणुकीमुळे मिळालेली मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापौर, उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.18) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महापालिका मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.