Pimpri: कोरोना मृतांवर एकट्या निगडी समशानभूमीतच अंत्यसंस्कार का ? – सचिन चिखले

Why is Corona cremated in the Nigdi cemetery alone? - Sachin Chikhale

कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे दगावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने सांगवीत सोय केलेली असताना, केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिकेची सबंधित यंत्रणा दबावाखाली त्या ठिकणी मृतदेह स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यांचाच कित्ता गिरवत पिंपरी व भोसरीतील मृतदेहांवरदेखील त्या ठिकाणी अंत्यसंस्कार न करता त्यांना निगडीत पाठविले जात असल्याचा आरोप मनसेचे गटनेते व शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला आहे.

पालिकेच्या कोरोना मृतदेह वाहक रुग्णवाहिकेवरील ‘त्या’ चार कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही येथील कामगार, मयताचे नातेवाईक व पर्यायाने परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागू शकतो.

त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना योग्य ती समज द्यावी; अन्यथा निगडी परिसरात आनंदनगरच्या घटनेप्रमाणेच पडसाद उमटतील, अशा इशारा चिखले यांनी दिला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. आजपर्यंत शहरात 929 रुग्ण कोरोनाने बाधित असून, 16 रुग्ण कोरोनोनामुळे मृत पावलेले आहेत.

पालिकेने कोरोनामुळे मृत पावलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांची नियमावली तयार केली आहे. मात्र, या नियमांना तडा देण्याचे काम पालिकेचा आरोग्य विभाग करताना दिसून येत आहे.

प्रत्यक्षात या नियमावलीनुसार रुग्णालयातून मृतदेह हलविण्याआधी त्यावर सॅनिटायझरने प्रक्रिया करून, तो मृतदेह प्लास्टिकच्या सहाय्याने लपेटून पुन्हा सॅनिटाईझ करून तो मोठ्या पिशवीत गुंडाळला गेला पाहिजे.

मृतदेहाचा कोठेही स्पर्श न होता, चार पीपीई कीटधारक मनपा कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह उचलून अलगद रुग्णवाहिकेत ठेवावा. त्यानंतर तो थेट स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीपर्यंत पोहोचवून त्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत त्या ठिकाणी हजर रहावे, अशी नियमावली आहे.

मात्र, या उलट प्रकार घडत आहे. त्या चार कर्मचाऱ्यांपैकी दोघेजण आलटून पालटून नातेवाईकांची मदत घेतात. रुग्णालयापासून मयताच्या नातेवाईकाला कोणतीही सुरक्षा उपकरणे न देता मृतदेह उचलणे, रुग्णवाहिकेत ठेवणे, रुग्णवाहिकेतून उचलणे, त्यानंतरचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे.

मयताच्या परिसरात येताच कर्मचारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन काढता पाय घेतात. शेवटी सर्व सोपस्कार त्या रुग्णांचे नातेवाईक व त्या विद्युतदाहिनीवरील कामगारांना पार पाडावे लागत आहेत.

अंत्यसंस्कार होण्याआधी व नंतर दोन्ही वेळेस विद्युत दाहिनी आवार सॅनिटायझरने निर्जंतुक करावा लागतो. परंतु, सॅनिटायझर फवारणी करणारा कर्मचारीच नसल्यामुळे केवळ चालढकल करावी लागते.

रात्री-अपरात्री मृतदेह दाहिनीवरून खाली पडतो. अशा वेळी त्या चार कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत मयताच्या नातेवाईकाला सहाय्यासाठी घ्यावे लागते. त्यामुळे निगडी विद्युतदाहिनीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुळात मयताच्या नातेवाईकांना या ठिकाणी प्रवेश निषिध्द असताना देखील कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी विस्तारण्यास आयतेच निमंत्रण मिळत आहे.

निगडी परिसर हा दाट लोकवस्ती असणारा भाग आहे. येथील विद्युतदाहिनीवर आधीचीच कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे निगडीतील विद्युतदाहिनीवर प्रचंड ताण येत आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या त्या-त्या भागातील मृतदेहांवर तिथेच अंत्यसंस्कार व्हायला हवेत.

मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे निगडी विद्युतदाहीनीला सर्वच ठिकाणाहून लक्ष केले जात आहे. अगदी जिल्ह्यातील मंचरहून देखील मृतदेह निगडीमध्ये अंत्यसंस्कारासाठी पाठविले जात आहेत.

निगडीत माणसं राहत नाहीत का? शहरात सर्व ठिकाणी सोय असताना देखील निगडीला स्मशानभूमी करणाऱ्या राजकारण्यांचा डाव शहर मनसे हाणून पाडील, असा इशारा चिखले यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.