Pimpri: पालिका कर्मचा-यांना एवढी कसली मस्ती चढली, अधिका-यांनो नीट वागा; नगरसेवकांचा संताप

नगरसेवकांना 'चोपून काढा' म्हणणा-या लघुलेखकाची भाजपकडून पाठराखण; लघुलेखकाला केवळ समज

एमपीसी न्यूज – शहरातील 22 लाख जनतेतून आम्ही निवडून आलो असून पालिकेचे विश्वस्त आहोत. तर, अधिकारी नोकरदार आहेत. नोकरदार विश्वस्तांना ‘चोपून काढण्या’ची भाषा कसा करु शकतो. आजपर्यंत एकाही अधिका-याचे असे बोलण्याचे धाडस झाले नाही. आता कसे धाडस होत आहे. महापालिका खासगी कंपनी असल्यासारखे अधिकारी वागत आहे. अनेक वर्ष एकाच जागेवर बसल्याने अधिका-यांमध्ये मस्ती आली आहे. नगरसेवकांना चोपून काढा म्हणा-या अधिका-याला माफी मागायला लावावी, निलंबित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली. तर, भाजपने त्यांची पाठराखण करत केवळ समज द्यायला लावले.

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेचे उपअभियंता अनिल राऊत यांच्या फिर्यादीवरून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्या समर्थनार्थ कर्मचारी महासंघाने केलेल्या आंदोलनात लघुलेखक रावसाहेब राठोड यांनी नगरसेवकांना ‘चोपून काढा’ अशी भाषा वापरली होती. त्यांच्या या व्यक्तव्यांचे तीव्र पडसाद महासभेत उमटले.

कोण काय म्हणाले :
संदीप वाघेरे (भाजप) :- मारहाण झाल्याचे सांगत कर्मचा-याने 24 तासानंतर कसा गुन्हा दाखल केला. राहुल कलाटे यांच्यावर दखलपात्र तर कर्मचा-यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या आवारात घटना घडूनही गुन्हा दाखल करताना कर्मचा-यांना वरिष्ठांना कल्पना दिली नाही. परवानगी न घेताच गुन्हा दाखल केला. त्यानंतर तीन दिवसांना अधिका-यांना ‘अॅट्रॉसिटी’ दाखल करण्याची कशी बुद्धी सुचली. एखद्या चित्रपटाप्रमाणे स्टोरी रचत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही काय महापालिकेत कर्मचा-यांचा मार खायला येतो का? लोकांनी आम्हाला मार खायला महापालिकेत पाठविले नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. अधिका-याला माफी मागलायला लावा. नाहीतर तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात यावे.

अजित गव्हाणे (राष्ट्रवादी):- अधिका-यांने काम टाळले हे पाहणे महत्वाचे आहे. जाणीवपुर्वक अधिका-यांनी काम टाळले नाही पाहिजे. योग्य काम केलेच पाहिजे. कामे अडविली जाता कामा नयेत. नगरसेवक चुकीच्या कामासाठी दबाव आणत असल्यास वरिष्ठांकडे तक्रार करा. पण, योग्य कामे पण विनाकारण अडवू नयेत. नगरसेवकांना चोपून काढण्याची भाषा चुकीची आहे.

सचिन चिखले (मनसे):- या प्रकरणाची शहानिशा होणे आवश्यक आहे. मारहण झाली असेल तर तीन दिवसांना गुन्हा का दाखल केला.

भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी):- शहरातील 22 लाख जनतेतून आम्ही निवडून आलो असून पालिकेचे विश्वस्त आहोत. तर, अधिकारी नोकरदार आहेत. नोकरदार विश्वस्तांना ‘चोपून काढण्या’ची भाषा कसा करु शकतो. आजपर्यंत एकाही अधिका-याचे असे बोलण्याचे धाडस झाले नाही. आता कसे धाडस होत आहे. महापालिका खासगी कंपनी असल्यासारखे अधिकारी वागत आहे. अनेक वर्ष एकाच जागेवर बसल्याने अधिका-यांमध्ये मस्ती आली आहे. अधिकारी, कर्मचारी महापालिकेचे सेवक आहेत. काम करून ते काही महापालिकेवर उपकार करत नाहीत. त्याचाच ते पगार घेतात. लोकप्रतिनिधींचा आदर ठेवून अधिकारी – कर्मचा-यांनी नीटच वागायचे.

नितीन काळजे (भाजप):- प्रशासन आणि नगरसेवक हे रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी जाताना आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक होते. कर्मचारी महासंघाला सांगणे अपेक्षित होते. ‘चोपून काढण्याची भाषा लोकशाहीला, नियमाला धरुन नाही. अधिका-यावर कारवाई झाली पाहिजे.

विरोधी पक्षनेते दत्ता साने:- मारहाण केल्याचा कोणताही पुरावा नसताना गुन्हा दाखल केला जातो. घटनाक्रम बघता तिस-यादिवशी कर्मचा-याकडून तक्रार दिली जाते. आम्ही आमच्या घरची कामे सांगत नाहीत. आमच्यावर कामासाठी निवडून दिलेल्या नागरिकांचा दबाव असतो. नारिकांचीच कामे आम्ही अधिका-यांनी सांगत असतो. नगरसेवकांना चोपून काढा म्हणने अतिशय संतापजनक आहे. कर्मचारी अशी भाषा करत असतील तर महापालिकेत दररोज सेफ्टीगार्ड घालूनच यावे लागेल. महापालिका आयुक्‍तांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा.

सभागृह नेते एकनाथ पवार: – ”लोकप्रतिनीधींना लोकांचे प्रश्न मांडताना जबाबदारीने वागले पाहिजे. घटना खरी की खोटी चौकशीनंतर बाहेर येईल. आयुक्तांनी त्याची चौकशी करावी. अधिका-यांनी जबाबदारीचे भान ठेवावे. महासंघाने कर्मचा-यांना समज द्यावी. मीदेखील एक कामगार नेता आहे. या कर्मचा-याला एक संधी देण्यात यावी”

महापौर राहुल जाधव म्हणाले, कर्मचा-यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. मर्यादीत राहून काम करण्यात यावे. आम्हाला 22 जनतेने निवडून दिले आहे. आम्ही जनतेचीच कामे सांगत असतो. त्यामुळे पुन्हा कोणी अशी भाषा वापरता कामा नये. संबंधित कर्मचा-याला योग्य ती समज द्यावी, असा आदेश त्यांनी आयुक्तांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.