Pimpri: धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीकपात कशासाठी? – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पाणीपुरवठा सुरळीत होता. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही नागरिकांना दररोज पाणी मिळत होते. आता धरण पूर्ण भरलेले असतानाही पाणीकपात सुरू आहे. त्याचे कारण काय, नियोजनाचा कुठे अभाव आहे, असा सवाल शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

खासदार डॉ. कोल्हे यांनी आज (शनिवारी) शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने उपस्थित होते. पाणी, स्मार्ट सिटी, वेस्ट-टू-एनर्जी या प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची सखोल माहिती प्रशासनाकडून मागविली होती. हा प्रकल्प सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले होते. त्याची सविस्तर माहिती घेणार आहे. स्मार्ट सिटीच्या कामाची माहिती घेणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ऑप्टिकल फायबरचे काम सुरू आहे. काम सुरू असताना खोदाई केलेले खड्डे व्यवस्थित बुजले नाहीत. बाजूला मुरुम टाकला आहे. ‘स्मार्ट सिटीचे स्मार्टली’ काम कशासाठी होतेय? याचा लेखाजोखा घेणार आहे. ई-लर्निग, ई-स्कूल या प्रश्नांची सखोल माहिती घेणार असल्याचेही त्यांनी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्रातील पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कोणाला मंत्री करायचे, याचा निर्णय पवारसाहेबच घेतील. परंतु, कार्यकर्ता म्हणून दादांनी उपमुख्यमंत्री काय, मुख्यमंत्री पण व्हावे असे वाटते, अशी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. तसेच मला काय वाटते, यापेक्षा पवारसाहेब काय ठरवणार, हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.