Pimpri: पाणीकपात का ? अजितदादांचा आयुक्तांना सवाल

कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपातीची विचारली कारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा का सुरु केला आहे? पाणीकपात कशासाठी केली ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांना विचारला. तसेच पाणीपुरवठा नियमित करायचा असेल तर काय करावे लागेल, असेही त्यांनी विचारले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची नुकतीच बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अजितदादांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपातीबाबत आयुक्तांना जाब विचारला. महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून समन्यायी पाणीवाटपासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “शहरात एक दिवसाआड पाणीकपात का केली अशी विचारणा अजित पवार यांनी बैठकीत केली होती. पाणी कपातीची सविस्तर कारणे त्यांना सांगितली आहेत. त्यावर पाणीपुरवठा नियमित करायचा असेल तर काय करावे लागेल, असेही त्यांनी विचारले. दररोज जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला 30 एमएलडी जादा पाण्याची आवश्यकता आहे. 30 एमएलडी पाणी कोठून उपलब्ध करायचे. त्यावर विचार करावा लागेल. त्यासाठी किमान 30 ते 35 एमएलडी जादा पाण्याची आवश्यकता आहे”

वाघोली पाणीपुरवठा योजना किंवा पवना धरणातूनही जादा पाणी मिळाले तरी चालेल. धरणातून सध्या पाणी उचलण्याची क्षमता नाही. त्याचे काम चालू केले आहे. डिझाईनिंग झाले असून लवकरच निविदा काढली जाईल. पवना धरणात यंदा जादा पाणी आहे. त्यामुळे धरणातून जादा पाणी मिळू शकेल. पण, दरवर्षी मिळणार नाही. निदान पावसाळ्याचे चार महिने ते पाणी वापरु शकतो. तशी यंत्रणा तयार करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. इलेक्ट्रीकल लोड वाढीव पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.