Pimpri: भोसरीकरांनी वेगळी भूमिका घेतल्यास पलटू शकते बाजी ?

विरोधक म्हणतात आम्हीच निवडून येणार, महापौर म्हणतात भाजपच्या उमेदवार निवडून येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरी मतदार संघातील विलास मडिगेरी यांचा भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, नाराज झालेल्या चिंचवड मतदार संघातील भाजपच्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोसरीतील उमेदवार असला तरी त्यांच्यावर वेगळा ‘शिक्का’ असल्याचे, महापौर राहुल जाधव म्हणाले. तर, भोसरीतील स्थायीच्या सदस्यांनी आमचा उमेदवार शीतल शिंदे अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रत्यक्षात भोसरीकरांनी वेगळी भूमिका घेतल्यास बाजी पलटू शकते. राष्ट्रवादी, शिवसेना, भोसरीतील सदस्य आणि शीतल शिंदे स्वतः असे मिळून नऊ तर भाजपकडे सातच मतदार राहतात. त्यामुळे बंडखोरी न शमल्यास वेगळाच निकाल लागू शकतो.

भोसरीकर संतोष लोंढे यांच्यासाठी आग्रही होते. तर, निष्ठावान म्हणून शीतल शिंदे यांचे नाव चर्चेत होते. परंतु, दोघांनाही डावलण्यात आले. शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बंडखोरी कायम राहिल्यास वेगळाच निकाल लागण्याची शक्यता आहे. भोसरीतील नम्रता लोंढे, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे हे तीन स्थायीचे सदस्य आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर असे चार आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे एक आणि स्वतः शीतल शिंदे असे मिळून एकूण नऊ सदस्य होत आहेत.

तर, दुसरीकडे सागर आंगोळकर, ममता गायकवाड, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे आणि स्वतः उमेदवार विलास मडिगेरी असे केवळ सातच सदस्य आहेत. त्यामुळे निवडून येण्यासाठी दोन सदस्यांची संख्या कमी पडू शकते. त्यामुळे बंडखोरी कायम राहिल्यास आणि राष्ट्रवादीने मयूर कलाटे यांचा अर्ज मागे घेऊन शीतल शिंदे यांना साथ दिल्यास शिंदे यांचे पारडे जड राहणार आहे. परंतु, बंडखोरी शमल्यास मडिगेरी यांचा मार्ग सुकर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.