Pimpri: सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार -नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – कामगार क्षेत्रात काम करणा-या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर भाजपने सभागृह नेतेपदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे. सभागृहाच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शहराची तहान भागविण्यासाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाला गती देणार असल्याचे नियोजित सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले. तसेच पक्षाची प्रतिमा उंचावेल असे कामकाज करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेते तथा सभागृह नेतेपदासाठी ढाके यांचे नाव बुधवारी (दि.12) जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज (सोमवारी) भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. ढाके यांची एकमताने भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी ढाके यांनी संवाद साधला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कामगाराची भाजपच्या गटनेतेपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सभागृहाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. शहरात कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे. आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न मार्गी लावणार आहे.

आंद्रा-भामा आसखेड धरणातून शहराला पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. तीन वर्षात मावळते सभागृह नेते एकनाथ पवार यांनी चांगले काम केले आहे. त्याच पद्धतीने मी करेल. किंबहुना त्यापेक्षाही चांगले काम करेन. भाजपची प्रतिमा उंचाविणार आहे, अशी ग्वाही ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.