Pimpri : अधिका-यांना कोंडणा-या भाजप नगरसेविकेचे पद रद्द करणार का ?, आयुक्त म्हणतात……..

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी कोंडल्याची सविस्तर माहिती घेतली आहे. अधिका-यांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी संबंधित अधिका-यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेविकेचे पद रद्द करण्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान, घटनेला 12 दिवस उलटून गेले. तरी, अद्यापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी शनिवारी (दि.1) रोजी पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्याला कासारवाडीतील पाण्याच्या टाकीखालील खोलीत कोंडून ठेवले होते. वरिष्ठ अधिका-यांना दोन तास कोंडून ठेवल्यामुळे अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिका-यांनी ‘सीएमओ’, ‘पीएमओ’कडे तक्रार केली आहे. बुधवारी अधिका-यांनी दंडाला काळी फित बांधून या घटनेचा निषेध केला.

याबाबत विचारले असता आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”कासारवाडीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कोंडल्याची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्याची देखील आमची तयारी होती. मात्र तशी वेळ आली नाही. नगरसेवक, कोणताही बड्या पदाधिकारी असो कोणीही कामात अडथळा आणल्यास, धाकटपशा दाखविल्यास अधिका-यांनी तत्काळ गुन्हा नोंदवावा”.

”कोण वेठीस धरत असल्यास तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. प्रशासन अधिका-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. कासारवाडीतील घटनेप्रकरणी अगोदर अधिका-यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेविकेचे पद रद्द करण्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल”, असे आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like