Pimpri : इस्कॉन आणि उद्योजक राहुल बजाज यांच्या सहकार्यातून दररोज 30 हजार गरजूंना मिळतोय ‘मायेचा घास’

एमपीसी न्यूज – कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या जीवघेण्या विषाणूपासून बचाव करायचा असेल तर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. सर्व राज्यांच्या व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्यामुळे बाहेरगावचे कामगार, मजूर, रोजंदारी वरचे कर्मचारी, विद्यार्थी, गरीब यांच्यावर उपासमारीची वेळ आली. सलग 21 दिवस संचार बंदीमुळे दोन वेळच्या जेवणाचा गंभीर प्रश्न या लोकांसमोर उभा राहिला, या प्रश्नाला उत्तर म्हणून इस्कॉन आणि उद्योजक राहुल बजाज यांनी दररोज 30000 गरजू व गरीब लोकांना अन्नदानाचा विडा उचलला

तीस हजार भुकेलेल्या लोकांच्या जेवणाची गरज भागवण्यासाठी इस्कॉनच्या स्वयंपाक घरात 60 कर्मचारी सकाळ, संध्याकाळ मेहनत घेत असतात. तसेच तयार केलेले अन्न या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे साधारण 250 कर्मचारी अन्न वितरणाचे काम करत असतात. पिंपरी-चिंचवडमध्ये साधारण 40 ठिकाणी तर पुणे शहरात दहा ते पंधरा ठिकाणी हे अन्न वितरणाचे काम सुरू असते. या कामासाठी संस्थेच्या 32 गाड्या कार्यरत असून सर्व गरजुंपर्यंत अन्न पोहचेल याची काळजी घेत असतात.

या आरोग्य आणीबाणीच्या काळात सर्वांना पोषक आहार मिळेल याची काळजी संस्थेतर्फे घेतली जाते. कडधान्य, फळभाज्या यांचा योग्य समावेश आहारामध्ये केला जातो. बाजारातील फळभाज्यांचे व इतर पदार्थांचे स्वयंपाकापूर्वी निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच स्वयंपाकघरात स्वच्छते बरोबर सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केला जातो. तयार केलेल्या अन्नाचे पॅकिंग करताना व त्यांचे वितरण करताना योग्य काळजी घेतली जाते. पॅकिंग केलेल्या अन्नाचे वाटप करण्यासाठी बजरंग दल, आरएसएस, विश्व हिंदू परिषद व इतर स्वयंसेवक मेहनत घेत असतात.


संस्थेच्या माध्यमातून शहरात काही ठिकाणी गरजू लोकांना शिधा वाटपाचे सुद्धा कार्य करण्यात आले आहे. इस्कॉनच्या वतीने देशभरात अन्नदानाचे काम सुरू असल्याचे संस्थेकडून सांगितले जाते. या अन्नदानाच्या कामासाठी दररोज सहा लाख रुपयांचा खर्च येत असून इस्कॉन, अन्नामृत फाऊंडेशन पुणेचे संचालक संजय भोसले यांच्या पुढाकारातून व उद्योगपती राहुल बजाज यांच्या आर्थिक सहाय्यामुळे हे शक्य झाले आहे.

सर्व छाया : देवदत्त कशाळीकर

‘देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती असून गरिबांचे दोन वेळच्या जेवणाची हाल होत आहेत. या काळात भुकेल्या व गरजू लोकांना जेवणाची सेवा पुरवण्याचे समाधान मिळत आहे’. सितापती दास : व्यवस्थापक – इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.