Pimpri: कोरोना चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढ अपेक्षितच, लक्षणे असलेल्यांनी उपचारासाठी पुढे यावे- आयुक्तांचे आवाहन

With the increase in corona tests, patient growth is expected, those with symptoms should come forward for treatment: Commissioner appeals

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून महापालिकेनेही चाचण्यांची संख्या वाढविली आहे. दिवसाला 350 हून रिपोर्ट तपासले जात आहेत. खासगी लॅबमधील सात ते आठ दिवसांचे प्रलंबित रिपोर्ट आले आहेत. जूनअखेरपर्यंत तीन हजार रुग्ण होतील, असा अंदाज आहे.

अपेक्षेनुसार रुग्ण वाढ होत असून आजपासून दररोज शंभर रुग्ण ग्रहित धरले आहेत. झोपडपट्टी भागात रुग्ण वाढीचे प्रमाण जास्त असून लक्षणे असलेल्या नागरिकांनी उपचारासाठी लवकर पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

मागील दोन दिवसात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. बुधवारी 81, तर गुरुवारी तब्बल 125 नवीन रुग्णांची भर पडली. शहरातील रुग्ण संख्या 1100 च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे.

त्यापार्श्वभूमीवर बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, महापालिकेने तपासण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्याही वाढायला लागली आहे. ही वाढ अपेक्षितच आहे.

दिवसाला 350 हून रिपोर्ट तपासले जात आहेत. काही खासगी लॅबमधून रिपोर्ट आले. ते पेडिंग होते. सात ते आठ दिवसांचे रिपोर्ट होते. त्यामुळे दोन दिवसात मोठी रुग्ण वाढ झाली.

आता कोरोनाचे रुग्ण वाढणारच आहेत. जूनअखेरपर्यंत तीन हजार रुग्ण होतील, असा अंदाज आहे. त्यानुसार आजपासून दररोज शंभर रुग्ण ग्रहित धरले आहेत.

ही झोपडपट्टी भागातील वाढ आहे. लक्षणे असलेल्या लोकांनी लवकर उपचारासाठी बाहेर यावे. लक्षणे असलेल्या लोकांमुळे कोरोनाचा जास्त प्रसार होतो.

एखाद्या व्यक्तीने सर्दी, खोकला, ताप अंगावर काढला तर, चार दिवसात तो सुमारे शंभर लोकांना संसर्ग करतो. सर्दी, खोकल्याची लक्षणे असतील तर तत्काळ तपासणी करावी.

रिपोर्ट निगेटीव्ह  आला तरी, कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये. जोपर्यंत सर्दी, खोकला आहे. तोपर्यंत मास्क लावूनच ठेवावा, असेही आयुक्तांनी सांगितले.

घरात क्वारंटाईन शक्य नसल्यास इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावे

पावसाळ्यामुळे फ्ल्यू वाढणार आहे. पावसाळी आजारही होणार आहेत. त्यामुळे कोण पॉझिटीव्ह आहे आणि कोण निगेटीव्ह आहे हे सांगता येणार नाही. पण, ज्याला सर्दी, खोकला, ताप येईल त्याने तत्काळ महापालिका रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे.

आपल्यामुळे घरात कोणाला त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरात क्वारंटाईन व्हावे. घरात शक्य नसेल तर पालिकेकडे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

…तर पुन्हा बंद करावे लागणार

रुग्ण वाढीचा अंदाज घेऊनच उघडीप दिली आहे. परंतु, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे. नियमांचे पालन करावे. गर्दी करु नये. अन्यथा रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी भितीही आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केली.

नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा बंद करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.