Pimpri: स्मार्ट सिटी अध्यक्षाविना!; तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील मिळेना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी अध्यक्षाविना आहे. स्मार्ट सिटीचे पदसिद्ध अध्यक्ष नितीन करीर यांची नगरविकास खात्यातून बदली झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे अध्यक्षपद रिक्त आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 1150 कोटींपेक्षा जास्त कामे होणार असताना मागील तीन वर्षांपासून स्मार्ट सिटीला स्वतंत्र ‘सीईओ’ देखील नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचा कारभार आयुक्त श्रावण हर्डीकरच हाकत आहेत. स्मार्ट सिटीत सावळा गोंधळ सुरु आहे. दोन-दोनवेळा निविदा रद्द केल्या जात आहेत. शहरात सर्वत्र रस्ते खोदले आहेत.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहराची 30 डिसेंबर 2016 रोजी निवड झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली.

या कंपनीच्या संचालक मंडळात महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, शिवसेना, मनसेचा एक सदस्य, आयुक्त, राज्य सरकार नियुक्त चार संचालक, केंद्र सरकारचा एक आणि दोन स्वतंत्र संचालक असे 15 जण आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे कंपनीचे पदसिद्ध अध्यक्ष होते.

मागील तीन वर्षांपासून नितीन करीर स्मार्ट सिटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. त्यांनी केवळ एक ते दोन बैठकांना महापालिकेत हजेरी लावली होती. राज्य सरकारने नुकतीच नगरविकास विभागातून करीर यांची महसूल विभागात बदली केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे.

करीर यांच्या जागी नगरविकास खात्यात जलस्त्रोत मंत्रालयाचे प्रधान सचिव आय.एस. चहल यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. नगरविकास खात्यात दोन प्रधान सचिव असतात. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी चहल यांची नियुक्ती होणार की राज्य सरकार दुस-या कोणत्या अधिका-याची नियुक्ती करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तीन वर्षांपासून स्वतंत्र ‘सीईओ’ देखील मिळेना!
पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी या प्रकल्पाअंतर्गत क्षेत्रीय पायाभुत सुविधा (एरिया बेस डेव्हलपमेंट) या तत्वावर शहर विकसित करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 1150 कोटींपेक्षा जास्त कामे होणार आहेत. स्मार्ट सिटी कंपनी ही महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकारची भागीदारी कंपनी आहे. स्मार्ट सिटीला मागील तीन वर्षांपासून स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देखील नाहीत. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडेच स्मार्ट सिटीचा अतिरिक्त पदभार आहे. दोनही पदभार असल्याने आयुक्तांचे स्मार्ट सिटीच्या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

याबाबत बोलताना स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, ”स्मार्ट सिटीचे पदसिद्ध अध्यक्ष नितीन करीर यांची नगरविकास खात्यातून बदली झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले आहे. पुणे स्मार्ट सिटी कंपनीचे देखील तेच अध्यक्ष होते. राज्य सरकार नवीन अधिका-याची नियुक्ती करेल. परंतु, अध्यक्ष नसल्याने बैठक घेण्यास कोणतीही अडचण नाही. महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेता येते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.