Pimpri : कठीण परिस्थितीवर मात करीत ‘ती’ झाली महिला रिक्षाचालक

जागतिक महिला दिनानिमित्त महिला रिक्षाचालक संगीता कांबळे यांचा प्रवास

(लीना माने)

एमपीसी न्यूज – पायलट बनून आकाशभरारी घेणाऱ्या तसेच ‘मोटरवुमन’ बनून लोकल चालविणाऱ्या महिला आज सर्वत्र दिसत असल्या तरी टॅक्सी-रिक्षा चालविण्याचे काम अजूनही पुरुषांच्याच ताब्यात आहे. मात्र बदलत्या सामाजिक-आथिर्क परिस्थितीत काळाची पावले ओळखून आता अनेक महिला रिक्षा चालवित आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये अशीच एक आहे ऑटो रिक्षा चालिका आहे, संगीता कांबळे. कठीण परिस्थितीवर मात करीत मोठ्या हिमतीने संगीता कांबळे यांनी रिक्षाचालक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे महिलांना एकच सांगणे आहे…… ‘हिम्मत मत हार….. ‘

गृहिणी म्हणजे त्या घररुपी गाडीचे स्टेअरिंग असते. तिच्या आधारावरच संपूर्ण आयुष्याच्या वाटेवर कुटुंबाचा गाडा सुरळीत धावत असतो. संगीता कांबळे या देखील आपल्या संसाराची गाडी सुरळीत चालत रहावी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत रिक्षा चालक म्हणून आपली भूमिका पार पडतात.

संगीता कांबळे सांगतात, “ माझ्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. घरची परिस्थिती चांगली नाही. निर्वाण व सिध्दार्थ या दोन मुलांची शिक्षण त्यांचा इतर खर्च याचा सारासार विचार करुन मनाशी ठाम निर्णय घेऊन मी रिक्षा चालवायला घेतली. आणि घराबाहेर पडण्याची हिंमत केली. यापूर्वी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मावशी म्हणून काम करीत होते. पण दुस-याच्या हाताखाली किती दिवस काम करणार, हा विचार करून रिक्षा चालविण्याचे धाडस केले. या व्यवसायात आल्यावर सुरुवातीला पुरुषांची मक्तेदारी असल्याने आणि प्रत्येक ठिकाणी थांबा पद्धत असल्याने सहकारी रिक्षा चालकांचा त्रास जाणवला. मात्र त्यावेळी ग्राहकांनी चांगली साथ दिली. आता पुरुष रिक्षाचालक मंडळीनी सुद्धा आम्हाला स्वीकारले आहे. रिक्षा चालवताना अनेक चांगले वाईट प्रसंग आलेही. पण त्याकडे दुर्लक्ष करुन रिक्षा चालवली. आता रिक्षा चालवताना घालायच्या कपड्यांमध्ये आरटीओने शिथिलता दिल्याने महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात या व्यवसायात येण्यास हरकत नाही”

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संध्याकाळनंतर सुद्धा त्यांना रिक्षा चालवण्याची इच्छा आहे. मात्र आपल्या ३ वर्षाच्या मुलीला मैत्रिणीकडे दिवसभर सोडणाऱ्या “आईला” ते शक्य होत नाही. मुलगी मोठी झाल्यावर महिलांसाठी संध्याकाळचा काही विशेष वेळ देण्याचा कांबळे यांचा मनसुबा आहे ”

जागतिक महिलादिनानिमित्त महिलांना संदेश देताना म्हणाल्या, ” या व्यवसायात अजूनही पुरुष मक्तेदारी असली तरी महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. त्यामुळे महिलांनी हिंमत न हरता पुढे यावे ” रिक्षा चालवण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांची खूप मदत झाली, असेही संगीता कांबळे यांनी आवर्जून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.