Pimpri : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘ती’

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने सिराज उद्दौलाचा पराभव केला आणि कंपनीने भारतात प्रवेश केला. व्यापाराच्या निमित्ताने  आलेल्या इंग्रजांनी भारतात बस्तान बसवले.  इंग्रजांना त्यांच्या मायदेशात घालविण्यासाठी आणि भारताला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेण्यासाठी भारतीय भूमीत हजारो आंदोलने झाली. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनांमध्ये महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने सक्रिय होत्या.

भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महिलांमध्ये कनकलता बरुवा, मातंगिनी हाजरा, बेगम हजरत अली, भोगेश्वरी फुकनानी, कस्तुरबा गांधी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, शुभालक्ष्मी, बेगम शेखावत हुसेन, रमाबाई पंडिता, ताराबाई शिंदे, बगलासुंदरी देवी, कैलासवासिनी देवी, जगतवासिनी देवी, ननी बाला देवी, कल्याणी दास, कल्पना दत्त, सुनिता चौधरी, शांती घोष, प्रितीलाता वाडेदर, दुर्गाबाई देशमुख, अॅनी बेझंट, मार्गारेट कझिन्स, सुबाम्मा, प्रभावती देवी, मनोरमा देवी, भगवती देवी, विंध्यावासिनी देवी, कामवासना देवी, सरोजिनी नायडू, उषा मेहता, लेडी टाटा, मुथुलक्ष्मी अशी कित्येक नावे घेता येतील. अनेक नावे आहेत. ज्यांच्यावर स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा करता येईल.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी पुरुषांसोबत महिला देखील तितक्याच ताकदीने लढल्या. ‘चूल आणि मूल’ या सामाजिक प्रथेत अडकलेल्या महिलांना आंदोलनाच्या भूमीत येण्यास विलंब झाला. सुरुवातीला आंदोलनातील प्रमुख भूमिकांऐवजी पुरुषांच्या मदतगार म्हणून महिलांचा राष्ट्रीय आंदोलनातील प्रवास सुरू झाला.

महिलांच्या स्थितीबाबत दोन विचारधारा समोर येतात. प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेत महिलांची स्थिती उत्तम असल्याचे ‘वृद्ध आरण्यक उपनिषदां’मध्ये सांगितले जाते. त्यात ऋषी याज्ञवल्क्य यांची पत्नी मैत्रियी बाबत उल्लेख आहे. महाभारतात द्रौपदीने भर सभेत आपले प्रखर मत मांडले. त्या वेळी संपूर्ण सभेच्या शरमेने नजरा झुकल्या होत्या. यांच्या परस्पर विरोधात काही जाणकारांनी आपली मतं मांडली आहेत. त्यांनी मनुस्मृतीचा दाखला देत ‘स्त्रीला जीवनात प्रत्येक अवस्थेत पुरुषाच्या संरक्षणात राहायला हवे’, असे त्यात म्हटले असल्याचे सांगितले आहे.

मागील काही शतकांमध्ये महिलांची स्थिती दयनीय झाली. धर्म, जाती, रूढी, परंपरा, पुरुष केंद्रित समाज व्यवस्था अशा अनेक बाबी यासाठी जबाबदार राहील्या. अठराव्या शतकाच्या मध्यात इंग्रजांनी प्लासीच्या लढाईने भारतात आपले पाय रोवले. तोपर्यंत सतीप्रथा, बालविवाह, शिक्षणाचा अभाव यांसारख्या प्रथांमध्ये स्त्री पुरती खचली होती. उपनिवेशिक प्रशासन इंग्रज आणि भारतीय विचार त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रथांना आळा बसला.

शासनाने महिलांच्या शिक्षणासाठी निधीची तरतूद सुरू केली. महाराष्ट्रात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. सरलादेवी यांनी 1904 मध्ये ‘भारत स्त्री महामंडळा’ची स्थापना केली. प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या बेगम शेखावत हुसेन यांनी लैंगिक समानता आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात काम केले. पंडिता रमाबाई यांनी 881 मध्ये ‘आर्य महिला सभे’ची स्थापना केली. महिलांच्या उद्धारासाठी त्या कार्यरत होत्या. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना कलकत्ता विद्यापीठाने त्यांच्या संस्कृतीत क्षेत्रातील ज्ञानाबद्दल ‘सरस्वती’ ही सर्वोच्च पदवी बहाल केली.

आंदोलनातील महिला भूमिगत राहिल्या, कारागृहात गेल्या, प्रत्यक्ष लढाईत सहभागी झाल्या. अटक झाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला त्यांनी खंबीरपणे तोंड दिले. ननी बाला देवी यासाठी प्रमुख नाव घ्यावे लागेल. क्रांतिकारकांना शरण देणे, क्रांतिकारकांची शस्त्रे ठेवणे, गुप्तचर पोलिसांना चकमा देणे अशी कामे या क्रांतिकारी महिला करत. 1917 मध्ये ननी बाला देवी पेशावरमध्ये गेल्या. तिथे त्यांना अटक करण्यात आली. झालेली शिक्षा देखील त्यांनी खंबीरपणे भोगली.

महिलांनी त्या काळात लढा दिला, ज्या काळात भारतीय समाजव्यवस्था महिलांच्या उंबरठा ओलांडण्यासाठीसुद्धा पूर्णपणे मानसिक आणि वैचारिकरित्या तयार झाली नव्हती. त्यामुळे क्रांतिकारी महिलांना भारतीय समाज आणि इंग्रजांची सत्ता या दोन्ही आघाड्यांवर तितक्याच ताकदीने लढावे लागत होते.

1920 च्या दशकात सामाजिक स्थिती बदलत होती. महिला शिक्षणाचा प्रसार होत होता. याच काळात 1923 मध्ये लिलावती नाग यांनी ढाकामध्ये ‘दिपाली संघा’ची स्थापना केली. 1928 मध्ये कल्याणी दास यांनी कलकत्ता विद्यापीठात ‘विद्यार्थी संघटने’ची स्थापना केली. क्रांतिकारी संघटना ‘युगांतर’ आणि ‘अनुशीलन’ मध्येही महिलांची प्रमुख भूमिका होती. यात कल्पना दत्त ज्या पुढे कल्पना जोशी म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी चटगाव शस्त्रागार लूट मध्ये सक्रीय सहभाग घेतला. सुनीता चौधरी आणि शांती घोष यांनी कोमिल्लाच्या मॅजिस्ट्रेटची हत्या केली. 1932 मध्ये बिना दास यांनी बंगालच्या गव्हर्नरच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. प्रितीलाता वाडेदर यांनी चटगाव येथील यूरोपियन क्लबवर हमला केला. ज्यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

सुरुवातीच्या काळात महिलांची राष्ट्रीय आंदोलनांमध्ये अप्रत्यक्ष भूमिका होती. नंतर महिलांनी राष्ट्रीय आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. सामाजिक, राजकीय, वैचारिक, क्रांतिकारी, शिक्षण, संघटन अशा अनेक आघाड्यांवर महिलांनी राष्ट्रीय आंदोलनांचे नेतृत्व केले. रामेश्वरी नेहरू यांनी 1909 मध्ये ‘स्त्री दर्पण पत्रिका’ सुरू केली. धरसना येथील मिठागरांवर मारलेल्या छाप्यात सरोजिनी नायडू यांची प्रमुख भूमिका होती. उषा मेहता यांनी राम मनोहर लोहिया यांच्यासोबत भूमिगत राहून रेडिओचे काम पाहिले. 1904 मध्ये सरलादेवी यांनी स्त्री महामंडळाची स्थापना केली. 1917 मध्ये अॅनी बेझंट आणि मार्गारेट कझिन्स यांनी मिळून ‘वूमेन्स इंडिया असोसिएशन’ची स्थापना केली.

1917 मध्ये सरोजिनी नायडू यांच्या संविधान समितीसमोर महिलांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणी आली. त्यावर महिलांनी जोरदार आवाज उठवला. 1919 च्या कायद्यान्वये महिलांना मर्यादित ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे महिला राष्ट्रीय आंदोलनासह स्वतःचे अधिकार, स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रात देखील काम करू लागल्या. 1925 मध्ये लेडी टाटा यांनी ‘नॅशनल कौन्सिल फॉर वूमन’ची स्थापना केली. 1927 मध्ये ‘इंडिया वुमन कॉन्फ्रेंस’ची स्थापना केली.

मार्गारेट कजीन्सच्या वुमेन्स असोसिएशनने पहिल्या गोलमेज परिषदेत महिलांचे प्रतिनिधी मंडळ पाठवले. याचा फायदा हा झाला की, त्यानंतर 1937 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महिला देखील सहभागी झाल्या. मद्रासच्या विधानसभा सदस्य म्हणून मुथुलक्ष्मी निवडून आल्या. त्या पहिल्या महिला विधानसभा सदस्य बनल्या.

महात्मा गांधींच्या आंदोलनांमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. सरोजिनी नायडू, मनिबेन पटेल, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, कमला नेहरू, स्वरुपराणी नेहरू यांची प्रामुख्याने नावे घेता येतील. गांधीवादी आंदोलनांपुरताच महिलांचा सहभाग नव्हता, याबाबत विस्ताराने उल्लेख झाला आहे. कम्युनिस्ट पार्टी, स्टुडंट फेडरेशन, 1946-47 मधील उत्तर बंगालमधील तेभागा आंदोलन, तेलंगाना आंदोलन, आझाद हिंद फौज, झाशीची राणी रेजिमेंट अशा अनेक पातळ्यांवरून महिलांनी आपला लढा दिला आहे. प्रसंगी प्राणांचेही बलिदान दिले आहे.

प्रत्येक आंदोलनाचा संदर्भ काळानुरूप बदलतो. काळानुरूप आंदोलनाच्या प्राथमिकता, मागण्या बदलत राहतात. सुरुवातीला स्वातंत्र्य लढ्यातील विविध आंदोलनात सहभाग, त्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार आणि मागील काही दिवसांपर्यंत वडिलांच्या संपत्ती मधील अधिकार. यामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या दोरीवर राहतील. अशा महिलांच्या आंदोलनाच्या प्राथमिकता राहिल्या आहेत. ‘ती’ने देशासाठी, समाजासाठी आणि ‘ती’च्यासाठी खंबीरपणे लढा दिला आहे.

इतिहासाच्या पानापानातून ती गौरवास्पद पात्र आहे. पण काहींनी तिची कुचंबणा केली असेल. तिचा आवाज, अस्तित्व दडपण्याचा प्रयत्नही केला असेल. हा वेगळा आणि संशोधनाचा विषय आहे. पण ‘ती’चे ‘ती’च्यासाठीचे योगदान इतिहासाला विसरता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.