BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरीतील महिलांनी दिला पुरग्रस्त महिलांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कोल्हापूर, सांगली भागात नुकताच महापूर येऊन गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आठ ते दहा दिवस हजारो घरे पाण्याखाली होती. आता पूर ओसरल्यामुळे मदत छावणीतून नागरीक संसार सावरण्यासाठी घरी परत येऊ लागले आहेत. त्यांना पिंपरीतील महिलांनी मदत देऊन हातभार लावत आहेत. 

पूरग्रस्त भागातील सर्वच ठिकाणी सार्वजनिक आणि  वैयक्तिक आरोग्याच्या समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत. यामध्ये महिला व शालेय, महाविद्यालयीन तरुणींची सॅनिटरी नॅपकीनच्या तुटवड्यामुळे कुचंबणा होत आहे. या महिला भगिनींची अडचण विचारात घेऊन पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्त्या संगिता तरडे यांनी आपण राहत असलेल्या सोसायटी व परिसरात घरोघरी जाऊन सॅनिटरी नॅपकीन गोळा करुन पुरग्रस्त भागातील महिलांना त्याचे वाटप करण्याचा संकल्प केला.

त्यांना पिंपरीच्या इंन्ररव्हिल क्लबच्या सभासद आणि पिंपरी चिंचवडच्या महिला पिनल वानखेडे, ॲड. शोभा कदम, निशा शिंदे, निता ढमाले, शैलजा खरोटे, गायत्री चौधरी, दिपाली जगताप, रंजना दर्शिले, अश्विनी कपोते, सुचेतना चव्हाण, कैवल्या भालेकर, लक्ष्मी दोडम, वैशाली जाधव, सुनिता कळसकर, पुजा भोंडवे, मीना दळवी, शशिकला शिंदे, रोहिणी कापुरे, विद्या तेवले, शाहिस्ता आदी महिलांनी एकत्र येऊन त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला पिंपरी चिंचवड परिसरातील महिलांनी प्रतिसाद दिला.

त्यातून दहा हजार सॅनिटरी नॅपकीन चार दिवसात जमा झाले. जमा झालेले हे सर्व नॅपकीन या महिलांनी जिल्हाधिकारी (पुनर्वसन कोल्हापूर, सांगली) विकास भालेराव यांच्याकडे सुर्पूद केले. आगामी काळात पुरग्रस्त भागातील दुर्गम परिसरातील कुटूंबांना आवश्यक भांडी व महिलांना ड्रेस, साड्या देण्याचा त्यांचा मनोदय आहे.

यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील महिलांनी आपल्या घरातील अनावश्यक परंतू पुरग्रस्त कुटूंबांना त्यांचा संसार पुन्हा नव्या उमेदिने उभारण्यास मदत होईल, अशी भांडी, कपडे, ड्रेस, सतरंज्या, चादर असे साहित्य द्यावे. तसेच ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी 9657317979 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन संगिता तरडे यांनी केले आहे.

.