Pimpri : वक्रदृष्टी पाहणाऱ्यांना महिलांनी निर्भयपणे कायदेशीर धडा शिकवावा -अ‍ॅड. सतीश गोरडे

एमपीसी न्यूज -महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून देश हादरून गेलेला असताना अशा घटना घडू नयेत म्हणून महिलांनी आपल्यामधील दुर्गारूप दाखवावे, असे आवाहन अ‍ॅड. सतीश गोरडे यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान कार्यशाळेत महिलांविषयक कायदे आणि स्वसंरक्षण या विषयावर ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पांडुरंग गायकवाड होते. यावेळी प्रा. मृणालिनी शेखर, डॉ. भारती यादव, प्रा. उद्धव घोडके, अ‍ॅड. सायली गोरडे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. वैशाली खेडकर, डॉ. प्रतिभा कदम, अ‍ॅड. देवानंद कुदळे आदी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. गोरडे यांनी महिलाविषयक कायदे, व महिलांचे अधिकार, याची माहिती दिली. यामध्ये हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तक व निर्वाह कायदा, विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा, हिंदू वारसा कायदा, भारतीय दंड संहिता, स्त्रियांचा अश्लीलता प्रदर्शन प्रतिबंध कायदा, वैद्यकीय कायदे, स्त्री कामगार विषयक कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, याबाबत माहिती दिली.

अ‍ॅड. गोरडे म्हणाले, “महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना यामुळे संतापाची लाट उसळली आहे. उन्नाव प्रकरण, दिल्लीतील निर्भया, हैद्राबाद घटना यामुळे देश हादरून गेला आहे. म्हणूनच अशा घटना घडू नयेत म्हणून महिलांनी आपल्यामधील दुर्गारूप दाखवावे. वेळप्रसंगी तुमच्या पर्समध्ये असणारे पेन, कटर, केसाची क्लिप, मोबाइल याचा वेळप्रसंगी वापर करावा तसेच घटना ज्याप्रमाणे घडली त्याचे शब्दोच्चारासहित लेखी वर्णन द्यावे. म्हणजे आरोपीला कडक शासन करता येते”

यावेळी प्रमिला भालके आणि मीनल लाड यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी संस्थेच्या वतीने होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.