Pimpri: फुगेवाडीतील मेट्रो स्थानकाच्या ‘कॉन्कोर्स’, ‘प्लॅटफॉर्म’चे काम प्रगतीपथावर

Pimpri: Work on 'Concourse', 'Platform' of Phugewadi metro station in progress अनलॉकमध्ये पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने सध्या 30 ते 40 टक्के क्षमतेने काम सुरु आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते रेंज हिल या मार्गावरील फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या ‘कॉन्कोर्स’, ‘प्लॅटफॉर्म’चे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, कोविडमुळे कामगारांचा तुटवडा आहे. कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मेट्रो प्रत्यक्षात कधी धावेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

जून 2017 मध्ये महामेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम सुरु आहे. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे एकाचवेळी चालू आहेत.

या मार्गावरील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. लॉकडाऊनमुळे काही काळ काम थांबले होते. त्यानंतर अनलॉकमध्ये पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने सध्या 30 ते 40 टक्के क्षमतेने काम सुरु आहे.

पीसीएमसी ते रेंज हिल या मार्गावरील फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या ‘कॉन्कोर्स’, ‘प्लॅटफॉर्म’चे काम प्रगतीपथावर आहे. काम लवकर पूर्ण करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरु आहेत.

‘कॉन्कोर्स’ म्हणजे काय?

मेट्रो स्टेशनची पहिली लेवल असते त्याला ‘कॉन्कोर्स’ म्हणतात. प्रवासी पहिले ‘कॉन्कोर्स’मध्ये जातो. तिथे तिकीट विक्री, स्वच्छतागृह असते. तेथून तिकीट घेतल्यानंतर प्रवाशाला मशिनमध्ये तिकीट टाकावे लागते. त्यानंतरच त्याला पुढे जाता येते. अन्यथा जाता येत नाही.

तेथून सरकत्या जिन्याने तो पुढे जातो. त्यानंतर ‘प्लॅटफॉर्म’ लेवल येते. असे प्रत्येक स्टेशनला दोन लेवल असतात. प्रत्येक लेवलला जायला लिफ्ट, सरकत्या, नॉर्मल जिन्याची सुविधा असणार आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना पुणे महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महाप्रबंधक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘फुगेवाडीतील मेट्रो स्थानकाच्या ‘कॉन्कोर्स’, ‘प्लॅटफॉर्म’चे काम प्रगतीपथावर आहे. सध्या कामगारांचा तुटवडा आहे. त्यामुळे काम 30 ते 40 टक्के क्षमतेने चालले आहे.

कोविडमुळे झालेले नुकसान अद्यापर्यंत कळत नाही. कारण, कोविडची परिस्थिती अद्यापही चालूच आहे. पूर्णक्षमेतेने काम सुरु झाल्यानंतर काम कसे, किती दिवसात पूर्ण होईल याचा अंदाज येईल.

किती दिवसांचे काम वाया गेले आहे. त्यानंतर ठेकेदारांसोबत बैठक घेऊन कामाची स्ट्रॅटजी ठरवता येईल. जास्त मशिन, कामगार लावून काम वेगाने पूर्ण करता येईल का, याचा अंदाज येईल. प्रत्येक काम वेगात पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रो कधी धावेल हे आत्ताच सांगता येणार नाही’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.