Pimpri: लॉकडाउनमध्ये कामावर ये-जा करताना कामगारांनी वाहन परवाना, ओळखपत्र बाळगणे बंधनकारक

Workers are required to carry a driving license and identity card while commuting to and from work in the lockdown : पालिका आयुक्तांचा सुधारित आदेश

एमपीसी न्यूज – कामगारनगरीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून शहरात लागू होत असलेल्या लॉकडाउनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे. या काळात कामगारांनी कंपनीत जाताना वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर घेतलेला असावा. कामावर जाताना-येताना ओळखपत्र, वाहन परवाना बाळगणे बंधनकारक आहे. याबाबतचा सुधारित आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते 6 या वेळेत सुरु राहतील. केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनांमध्ये इंधन पुरवठा करतील.

औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. रुग्णसंख्या 7635 झाली आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहर लॉकडाउन असणार आहे.

दरम्यान, उद्योजकांच्या मागणीनंतर उद्योग, कारखाने, कंपन्यांना लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे. या कालावधीत कामगारांच्या कंपनीत जा-ये बाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नियमावली जाहीर केली आहे.

लॉकडाउन काळात सर्व औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. या आस्थापना मधील कार्यरत अधिकारी, कामगारांना एचआर विभाग प्रमुखांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरिता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

परवाना देताना कर्मचा-याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कर्मचा-याचा आयडी क्रमांक, वाहनक्रमांक, कोठून कोठे जाणार तसेच त्यावर कामाची वेळ देण्यात यावी. हा पास 23 जुलैपर्यंत वैध राहील. पासाचा दुरुपयोग झाल्यास तत्काळ रद्द करण्यात येईल.

कंपनीकडून देण्यात आलेल्या परवान्यांची माहिती पोलीस आयुक्त, पोलीस स्टेशन प्रभारी यांना सादर करावी. तसेच कंपनीकडून देण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 [email protected] आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 [email protected] या मेलवर पाठविण्यात यावी.

कामगारांनी कामावर जाताना व परत येताना प्रवासा दरम्यान कंपनीचे ओळखपत्र व कंपनीकडून पुरविण्यात आलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आला आहे.

तथापि, ज्या औद्योगिक आस्थापनामध्ये कोविडाचा रुग्ण आढळून आल्यास बाधित कामगार, अधिकारी कार्यरत असलेल्या युनीटमधील सर्व कामगारांची कोविडची तपासणी स्व:खर्चाने करणे बंधनकारक राहील.

दरम्यानच्या कालावधीत संबंधित युनिट बंद ठेवण्यात यावे. चाचणी आणि संबंधित युनिटचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यानंतरच ते परत कार्यान्वित करावे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीसच फक्त कामावर उपस्थित राहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.