Pimpri: विजय शिवतारे यांना कार्यकर्तेच उत्तर देतील -पार्थ पवार

एमपीसी न्यूज – शिवसेना राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. ती त्यांना करु द्या, त्यांचे ते राजकारण आहे. दादांवरील आणि माझ्यावरील टीकेला कार्यकर्तेच योग्य ते उत्तर देतील. त्यावर मला काही बोलायची गरज नाही, असे सांगत पार्थ पवार यांनी शिवतारे यांच्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

मावळ येथील महायुतीच्या प्रचारसभेत विजय शिवतारे यांनी बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. तर, पबमध्ये नाचणारे आता रथयात्रेत नाचू लागल्याचे सांगत पार्थ यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याबाबत विचारले असता पार्थ म्हणाले, “त्यांना वैयक्तिक टीका करायची आहे. ती करु द्या. मला काही बोलायची गरज नाही. संपूर्ण मतदारसंघात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जनतेची चांगली साथ मिळत आहे. दादांवर प्रेम करणा-या सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत आहे” असे पार्थ पवार यांनी सांगितले.

  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील देखील यावेळी उपस्थित होते. प्रतीक यांना राजकारणातील प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, “राजकारणात तरुणांनी यावे. मात्र सध्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणांपेक्षा वडिलांच्या मतदारसंघात कामे करणे अधिक आवडते. त्यातच आनंद आहे”

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, ”आमचा उमेदवार हुशार आहे. सुशिक्षित आहे. अजित पवार व शरद पवार यांनी विकासकामे केली आहेत. पवार कुटुंबियानी प्रेम दिले आहे. शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारात जास्त काम करत असल्यामुळे मावळची काही कल्पना नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.