Pimpri : सायकलवरून जगभ्रमंती करणा-या वेदांगीचा ज्ञानप्रबोधिनीतर्फे सत्कार

एमपीसी न्यूज  – सायकलवरून 13 देशांची सहल करणा-या वेदांगी कुलकर्णीचा ज्ञानप्रबोधिनी निगडी तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तिने केलेली भ्रमंती शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारतातील युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे. वेदांगी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीची माजी विद्यार्थिनी आहे.

सत्कार समारंभासाठी संस्थेचे संचालक डॉ. गिरीशराव बापट, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्य सुभाष गदादे, पर्यवेक्षिका विद्या उदास, इंग्रजी विभागप्रमुख मधुरा लुंकड, वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते. वेदांगीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

वेदांगी कुलकर्णी म्हणाली, “13 देश, साडेपाच महिने आणि 29 हजार किलोमीटरचा प्रवास. प्रवासात आलेली जंगले, जंगली श्वापदे, ऊन, वारा, पाऊस, डोंगर, द-या, निसर्गाची हिरवळ, खळखळणारं पाणी, भेटणारी अनोळखी लोकं, त्यांची होणारी मदत या सगळ्या गोष्टी एखाद्या कथेला साजेशा वाटतात. पण मी या सगळ्या गोष्टी स्वतः या प्रवासादरम्यान अनुभवल्या आहेत. सुरुवातीला मनाली ते खारडुंग ला हा अवघड प्रवास सायकलवरून केला. त्यावेळी सायकलप्रवासाची आवड वाढली. त्यानंतर इंग्लंड येथे शिक्षणासाठी गेले. तिथे शिक्षण घेत असताना इंग्लंडमधील ज्या खेळाडूंनी विविध क्षेत्रात विक्रम बनविले आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्या मार्गदर्शनातून इंग्लंडच्या एका टोकावरून दुस-या टोकाचा सायकल प्रवास यशस्वीपणे केला. तिथेही सायकल प्रवास करण्याचा आत्मविश्वास वाढला.

अनुभव आणि आत्मविश्वास याच्या जोरावर सायकल प्रवासाचा जागतिक विक्रम बनविण्याचा निश्चय केला आणि प्रवास सुरु झाला. वाटेत अनेक काळजी घेणारी माणसे भेटली. कोणताही माणूस कधीच चुकीचा किंवा धोकादायक नसतो, याचा अनुभव या प्रवासात आला. त्यामुळे एकटीने जाण्याची भीती कधीच वाटली नाही. वादळं आली, जंगली प्राण्यांनी पाठलाग केला. पण त्यांचाही सामना करून हा प्रवास सुरु ठेवला. एके ठिकाणी डोक्याला जखम झाली. त्यावेळी त्या अनोळखी माणसांनी मला मदत केली. अशा रीतीने दररोज किमान 200 किलोमीटर प्रवास पूर्ण करत 159 दिवस 13 देशातून प्रवास केला. वडिलांना अभिमान वाटेल असे काम करायचे होते, असेही वेदांगीने सांगितले.

मनोज देवळेकर म्हणाले, “भारताची 40 टक्के लोकसंख्या सध्या युवा आहे. त्या सगळ्या युवा पिढीला प्रेरणादायी काम वेदांगीने केले आहे. जगण्याची प्रेरणा तिच्याकडून मिळणार आहे. ती ज्ञानप्रबोधिनीची माजी विद्यार्थिनी असल्याचा शाळेला अभिमान आहे.”

विवेक कुलकर्णी म्हणाले, “जगभ्रमंती करण्यापूर्वी तिने केलेल्या काही साहसी प्रवासामुळे तिची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास वाढला. तिचा आत्मविश्वास हीच आमच्यासाठी मोठी ताकद होती. त्यामुळे तिच्या जगभ्रमंतीसाठी कोणतीही काळजी वाटली नाही.”

गिरीश बापट म्हणाले, “वेदांगीने केलेल्या पराक्रमाचा सर्वांना अभिमान आहे. मध्ययुगात युरोपीय लोकांनी साहसी सहली केल्या. त्यांच्याकडे असलेली काहीतरी वेगळं शोधण्याची उर्मी वेदांगीकडे आहे. यापेक्षा मोठा जागतिक विक्रम तिने करावा, या शुभेच्छा”

प्रास्ताविक मधुरा लुंकड यांनी केले. विद्यादेवी उदास यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.