Pimpri: चिंताजनक ! कोरोनाविरोधात लढणाऱ्या पालिकेच्या योद्ध्यांनाही संसर्गाने घेरलं

Pimpri: Worrying! The municipality's warriors fighting against Corona were also infected कोरोना विषाणू आल्यापासून महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत.

एमपीसी न्यूज – मागील पाच महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योद्ध्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, अभियंते, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. अनेकांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढणा-या पालिकेच्या चार डॉक्टरांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दुर्दैवाने पालिकेचा एक उपलेखापाल आणि एक शिक्षकाचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोना विषाणू आल्यापासून महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. सुमारे पाच महिन्यांपासून कोरोनाविरोधातील लढाई लढत आहेत. कोरोनाच्या महामारीत काम करणा-या महापालिका कर्मचा-यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

कोरोनाविरोधात लढणा-या या कर्मचा-यांनाही कोरोनाने घेरले आहे. जवळपास 40 हून अधिक कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाने विळखा घातला आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून अनेकांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढणा-या पालिकेच्या चार डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत सात डॉक्टरांना या योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर, नर्स, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, वॉर्डबॉय, आया, मावशी, अभियंते, शिक्षक, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कर संकलन कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचारी, वाहनक चालक अशा 40 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांना लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी आहे. सर्वजण आपली जबाबदारी चोखपणे पार पडत आहेत.

रुग्ण शोधणे, तपासणी आणि उपचार या साखळीत काम करत आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असताना कळत नकळतपणे बाधितांच्या संपर्कात येतात. त्यातून त्यांना संसर्ग झाला आहे.

पालिकेचे डॉक्टर, नर्स, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, वॉर्डबॉय यांच्यासह उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य विभागातील कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जनतेची काळजी घेणे आवश्यक आहे. पण कर्मचा-यांनीही काम करताना काळजी घ्यावी. प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.