Pimpri : वायसीएम रुग्णालयातील 97 कंत्राटी पदांची लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द!; परीक्षार्थींमध्ये गोंधळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील 97 कंत्राटी पदांसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. दरम्यान, अचानक रद्द झालेल्या परीक्षेमुळे परीक्षार्थींना गोंधळ घातला.

ब्लड बँक टेक्निशियन (2 पदे), ब्लड बँक कॉन्सिलर (एक पद), एम.एस.डब्ल्यू (एक पद), डाटा एन्ट्री ऑपरेटर (5 पदे), डायलेसिस टेक्निशियन (एक पद), फार्मासिस्ट (5 पदे), एक्स-रे टेक्निशियन (3 पदे), जी.एन.एम स्टाफनर्स (66 पदे), लॅब टेक्निशियन (3 पदे), पुरुष कक्ष मदतनीस (5 पदे), स्त्रीकक्ष मदतनीस (5 पदे) अशा 97 कंत्राटी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात आले होते.

13 डिसेंबर 2019 रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत सुरु झाली. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 23 डिसेंबर 2019 होती. मानधन तत्वावर ही सर्व पदे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार होती. अर्ज करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली. या मुदतीमध्ये राज्यभरातून तब्बल चार हजार उमेदवारांनी अर्ज केले. या पदांसाठीची लेखी परीक्षा गुरुवारी (दि. 26) आणि शुक्रवारी (दि. 27) होणार होती. मात्र, प्रशासनाकडून अचानक परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे परीक्षार्थींचा चांगलाच हिसमुस झाला. परीक्षार्थींनी गोंधळ घालून आपला संताप व्यक्त केला.

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद वाबळे म्हणाले, “कंत्राटी 97 पदांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यातील पात्र आणि अपात्र अर्जाची छाननी करण्याचे काम सुरु आहे. पात्र उमेदवारांना परीक्षेला बसता येते. 26 आणि 27 डिसेंबर रोजी यासाठी लेखी परीक्षा होणार होती. मात्र, ती अचानक रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय अचानक वाटत असला तरी याबाबतचे नोटिफिकेशन 24 डिसेंबर रोजी संकेस्थळावर देण्यात आले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.