Pimpri: ‘वायसीएम’ रुग्णालयात मानधनावर 60 पदांसासाठी भरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील अपुऱ्या मनुष्यबळाचे “विघ्न’ दूर होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा आचारसंहितेच्या धसक्‍याने मानधनावर तज्ज्ञ डॉक्‍टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदांची भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेसह प्रतीक्षा यादीतील 60 पदांची भरती मानधन तत्त्वावर केली जाणार आहेत.

वायसीएम रुग्णालयातील 10 वैद्यकीय अधिकारीपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात 29 वरिष्ठ व 63 कनिष्ठ निवासी पदे सहा महिने कालावधीकरीता नियुक्त करण्यासाठी महापालिकेने निवड प्रक्रिया राबविली होती. त्यात निवड झालेल्या 15 वरिष्ठ व 24 कनिष्ठ निवासी अशा 39 उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

याखेरीज वायसीएम रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात स्टाफनर्स, ब्लड बॅंक टेक्‍निशियन, ब्लड बॅंक कौन्सिलर, एमएसडब्ल्यु, डायलेसिस टेक्‍निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, एक्‍स-रे टेक्‍निशियन, लॅब टेक्‍निशियन, पुरुष कक्ष मदतनीस, स्त्री कक्ष मदतनीस ही पदे सहा महिने कालावधीसाठी मानधनतत्त्वावर भरण्यात येणार आहेत. यापैकी 78 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी 66 उमेदवार रुजू झाले.

उर्वरीत 12 जागांपैकी प्रतीक्षा यादीतील विविध पॅरामेडीकल पदावर 11 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.