pimpri:  कोरोनाबाधित बालकांसाठी ‘वायसीएम’ ठरले ‘देवदूत’; 175 बालकांवर यशस्वी उपचार

'YCM' became 'Devdoot' for children coronary disease; Successful treatment of 175 children : 'शून्य' टक्के बाल मृत्यू असलेले पिंपरी-चिंचवड राज्यात एकमेव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे अत्यंत दिलासादायक चित्र आहे. कोविड आजाराचा पहिला रुग्ण शहरात आढळून आल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने दूरदृष्ट्री ठेवत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) ‘बालरोग कोरोना वॉर्ड’ची सुरुवात केली. हा वार्ड कोरोनाची लागण झालेल्या चिमुरड्यांसाठी अक्षरश: देवदूत ठरत आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टर , चांगल्या सुविधा यामुळे एप्रिलपासून दाखल झालेले प्रत्येक कोरोनाबाधित बालक अगदी ठणठणीत होऊन घरी गेले आहे. अशा कोरोनाबाधित 175 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. कोरोनाबाधित शहरांपैकी ‘शून्य’ टक्के बाल मृत्यू असलेले पिंपरी-चिंचवड राज्यात एकमेव आहे.

शहरात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ‘बालरोग कोरोना वॉर्ड’ची सुरुवात केली. हा वॉर्ड 26 एप्रिल 2020 रोजी सुरू झाला. एप्रिलमध्ये 13 कोरोना बाधित बालकांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले.

त्यानंतर मे मध्ये 17, जून महिन्यात 102 तर जुलै 43 बालकांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वय वर्ष 1 ते 12 वर्षपर्यंतच्या बालकांचा समावेश होता .

बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके म्हणाल्या, कोरोनाबाधित बालकांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत नव्हती. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शासनाने दिलेल्या सर्व अटी- शर्तींचे पालन करून त्यांच्यावर उपचार केले.

एप्रिलमध्ये सुरवातीला बालकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर 7 कोरोनाग्रस्त मुले बालरोग विभागात दाखल झाली होती. त्यामध्ये रूपीनगर, निगडी मधील 5 मुलांचा, तर भोसरीतील दोघांचा समावेश होता. या मुलांवर वेळोवेळी सर्व उपचार करीत 14 दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले होते.

यापैकी दोन मुलांवर करोनाचे उपचार चालू असतांना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण 30,000 व 66,000 असे प्रयोगशाळेतील अहवालानुसार झाले होते. सशक्त मुलांमध्ये हे प्रमाण 1,50,000च्या वर असते. त्यासाठी या मुलांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले.

डॉ. अंबिके यांनी पुढे म्हणाल्या, बालरोग अतिदक्षता विभागात कोरोना बाधित बालकांना त्यांच्या आईसोबत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात गेल्या 100 दिवसांमध्ये 175 मुलांनी कोरोनावर मात केली. यामध्ये एकही मूल दगावले नाही.

लहान मुलांची प्रतिकारक्षमता आईच्या दुधामुळेच वाढते. त्यात मुल आईच्या सानिध्यात राहिल्यास इन्फेक्शन वाढण्याची भिती कमी असते. मूल दूर ठेवल्यास ते अस्वस्थ होते रडून रडून त्याची प्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे दाखल झालेल्या 80 टक्के मुलांची आई त्यांच्यासोबत बालरोग विभागात होती.

त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासोबत त्यांच्या मातांवरही कोरोना पॉझिटिव्ह समजूनच औषध उपचार करण्यात आले. यातून मुले आणि माता दोघेही ठणठणीत होऊन घरी परतले.

प्रत्येक आई आणि मुलांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दाखल झालेल्या मुलांमध्ये ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे होती. त्यामध्ये ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते.

गेल्या तीन महिन्यात 16,12 आणि पाच दिवसांचे कोरोनाबाधित बालक दाखल झाले होते. नवजात शिशु विभागातून हि बालके आमच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यापैकी दोघांना प्लेटलेट कमी होऊन एकाला शौचाच्या जागेतून रक्त जात असल्यामुळे अतिजोखमीची परिस्थिती निर्माण झाली.

मात्र, चांगल्या आणि वेळीच उपचारांमुळे तिन्ही मुले अतिजोखमीच्या आजारातून बरी झाली.

बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या निगराणीत आता 10 कोरोनाबाधित मुले उपचार घेत आहेत. यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिकेत लाठी, डॉ. सीमा सोनी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे, असे डॉ. दीपाली अंबिके यांनी सांगितले.

सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना कोरोना सारख्या महामारीतून पुनर्जन्म मिळाला आहे.

जगभरात सुरु असलेल्या संशोधनानुसार नवजात अर्भकांना कोव्हिड-19 चा धोका असतो. कोव्हिड-19 चं संक्रमण झालेल्या 10 पैकी एका अर्भकामध्ये गंभीर लक्षणं दिसत असली तरी वय वाढल्यानंतर हे प्रमाण फारच कमी होते. मात्र, तोपर्यत मृत्यूदर कमी करणे , शिथिल करणे महत्वाचे असते.

त्याकरिता कोविड निवारणासाठी बालरोग विभाग अधिक सक्रिय असावा, अशी शासनाची मार्गदर्शक तत्वे सांगतात . जगभरात 3-5 या वयोगटातल्या संक्रमण झालेल्या 100 पैकी फक्त 3-4 मुलांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली आहेत.

त्यामुळे कोरोनाबाधित शहरांपैकी ‘ शून्य ‘ टक्के बाल मृत्यू असलेले पिंपरी-चिंचवड राज्यात एकमेव आहे. हि गोष्ट वाखणण्यासारखी आहे.

कोरोना बाधित मुलांवरील संशोधन करणाऱ्या हावर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या या संदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनमध्ये 16 जानेवारी ते 8 फेबुवारीदरम्यान तब्बल 2 हजार 143 मुलाना कोविड -19 चे संक्रमण झाले. प्रौढ व्यक्तीच्या तुलनेत संक्रमण झालेल्या या मुलांमध्ये परिणाम सौम्य दिसून आला.

त्यांना ताप आणि खोकला होता. पण, श्वास घेण्यास त्रास जाणवला नाही. असे असले तरी एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उर्वरित 10 टक्के बालकांच्या अभ्यासानुसार एका वर्षातील 10.6 टक्के बालके गभीरपणे संक्रमीत होती.

हेच 1 ते 5 वर्ष वयोगटात 7.3 टक्के, 6 ते 10 वयोगटात 4.2 टक्के, 11 ते 15 वर्ष वयोगटात 4.1 टक्के प्रमाण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.