Pimpri: ‘वायसीएम’च्या उपकरण खरेदीत गैरव्यवहार -मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) मे. युका डायग्नोस्टिक्स या कंपनीने अत्यंत निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटर्स आणि मल्टिपॅरा मॉनिटर्स पुरविले आहे. उपकरणे देताना ठरवून दिलेल्या एकाही अटीचे या कंपनीने पालन केले नाही. तरीही रुग्णालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उपकरणे स्विकारली. त्यामुळे संबंधित कंपनी, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 17 व्हेंटीलेटर्स आणि 40 मल्टिपॅरा मॉनिटर्स बसविण्याचा ठेका कोल्हापूर येथील मे. युका डायग्नोस्टीक्स ठेकेदाराला देण्यात आला आहे. हा ठेका देताना महापालिकेने व्हेंटिलेटर्स टेक मी. टी. एस. या कंपनीचे आणि युएस एफडीए प्रमाणित असणे आवश्यत आहे, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, सबंधित ठेकेदाराने या अटीचे पालन केले नाही.

युएस एफडीएच्या वेबसाईटवर प्रमाणित नसलेले व्हेंटिलेटर्स या ठेकेदाराने रुग्णालयाला पुरविले आहेत. तसेच हे मशिन योग्य कंपनीचे असल्याचे भासविण्यासाठी मशिनवर बनावट स्टिकर्सही चिटकविण्याचे काम या ठेकेदाराने केले आहे. मल्टिपॅरा मॉनिटर्सही अत्यंत निकृष्ट दर्जाचे पुरविले आहे.

ठेकेदाराने रुग्णालयाला 40 मल्टिपॅरा मॉनिटर्सही पुरविले असून अवघ्या दोन महिन्यांत या उपकरणांमध्ये बिघाड होऊ लागला आहे. दरम्यान, एका व्हेंटिलेटर्सची किंमत 15 लाख 50 हजार एवढी आहे. एकून 17 व्हेंटिलेटर्सची किंमत 2 कोटी 63 लाख 50 हजार एवढी आहे. एवढी किंमत मोजूनही रुग्णलयाला चांगल्या दर्जाचे उपकरणे मिळालेली नाहीत.

तसचे एका मल्टिपॅरा मॉनिटर्सची किंमत 2 लाख 80 हजार रुपये आहे. एकूण 40 मल्टिपॅरा मॉनिटर्सची किंमत 1 कोटी 12 लाख एवढी आहे. एकंदरीत रुग्णालयातील कोट्यावधींच्या उपकरण खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून यात रुग्णालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर करावई करावी, अशा मागणी भापकर यांनी केली आहे.

ठेकेदाराने रुग्णालयाला पुरविलेली उपकरणे ही चांगल्या दर्जाची आहेत. तसेच निविदेत दिलेल्या अटींचे पालन करून पुरविण्यात आली आहेत असे लिहून देण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक वायसीएम रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यावर दबाव टाकत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्सचे बिल लवकर मंजूर करावे, यासाठीही त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.