Pimpri: ‘येस’ बँकेत पैसे अडकल्याने विरोधक आयुक्तांना घेरणार; महासभेसमोर प्रश्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी क्षेत्रातील ‘येस’ बँकेसोबत आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला होता का?, बँक आर्थिक संकटात जात असताना महापालिकेने पैसे काढण्यासाठी काय पाठपुरावा केला का? असे विविध प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महासभेसमोर विचारले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (दि.20) होणा-या महासभेत यावरुन वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आयुक्तांना घेरण्याच्या तयारीत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अधिक व्याजाच्या आमिषाने ऑगस्ट 2018 खासगी असलेल्या ‘येस’ बँकेशी व्यवहार करत महापालिकेचा दैनंदिन भरणा सुरु केला. कर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगीतून मिळणारा महसूल ‘येस’ बँकेत भरला जात होता. तथापि, ‘येस’ बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील ‘येस’ बँकवर गुरुवारी (दि.5) निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे महापालिकेचे ‘येस’ बँकेत तब्बल 984.26 कोटी अडकले आहेत. त्यामुळे महापालिका आर्थिक टंचाईत आली आहे. कर्मचा-यांचे वेतन, सातव्या आयोगावर परिणाम झाला आहे. खासगी बँकेत पैसे ठेवल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर टीका होत आहे.

मार्च महिन्याची सभा शुक्रवारी (दि.20) होणार आहे. या सभेसमोर राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी ‘येस’ बँकेत पैसे गुंतविल्यासंदर्भात विविध प्रश्न विचारले आहेत. महापालिकेने इतर बँकांमधून ‘येस’ बँकेत ठेवी हलविण्याच्या निर्णय ज्या बैठकीत घेतला. त्या बैठकीचे इतिवृत्त सभागृहासमोर ठेवावे. हा निर्णय घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीला हजर असलेल्या अधिकारी, लोकप्रतिनिधींचा तपशील सभागृहासमोर द्यावा. हा निर्णय घेताना ‘येस’ बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला गेला होता का?, घेतला असेल तर तपशील द्यावा.

सन 2018 पासूनच ‘येस’ बँक आर्थिक संकटात पडत होती आणि त्यासंबंधी महापालिका प्रशासनाने काही पाठपुरावा घेतला होता का?, घेतला असेल तर तपशील द्यावा. पुणे, औरंगाबाद महापालिकेने त्यांच्या ठेवी ‘येस’ बँक आर्थिक संकटात येताच पैसे, ठेवी दुस-या बँकेत वळविल्या होत्या.

या घटनेचा पिंपरी महापालिका प्रशासनाने काही पाठपुरावा घेतला होता का?, घेतला असेल तर त्याचा तपशील द्याला. महापालिकेच्या बँकेतील ठेवी आणि त्यांची सुरक्षितता यासाठी महापालिकेने काही नियम किंवा मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत का?, केल्या असतील तर त्याचा तपशील द्यावा, असे प्रश्न भोईर यांनी विचारले आहेत. ‘येस’ बँकेतील पैसे अडकल्याने विरोधकांनी आयुक्तांनी घेरण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, पुणे शहरातील माजी महापौर संघटनेतर्फे पुणे आणि पिंपरी महापालिकेने खासगी असलेल्या ‘येस’ बँकेत एवढे पैसे कसे गुंतवले’ याची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर अजितदादांनी तत्काळ याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दोनही महापालिकांना देत अहवाल मागविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.