pimpri : लॉकडाऊनमध्ये घरात बसून मन लागेना; मग असा घालवा वेळ

एमपीसी न्यूज( डॉ. संजीवकुमार पाटील) : ‘कोरोना से डरोना !’ , ‘अब जो जिंदगी है सामने,अच्छे से जीलोना !’, ‘जो जो करना चाहते थे,आज मौका है,तो करोना’. कोरोना व्हायरसमुळे होणारा आजार आणि मग त्यातून येणारं मृत्यूचं संकट टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं, म्हणजे संचारबंदी केली. पण त्यामुळे घरात बसून बसून करणार तरी काय ? आणि किती वेळ? किती दिवस? काही कळत नाहीये, अश्या समस्या सध्या अनेकांना त्रास देत आहेत.याबद्दल आपण आज जरा विचार करूया. एकेक मुद्दा समजावून घेऊया.

सर्वप्रथम काहीही झालं तरी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही म्हणजे नाही,आणि स्वतः ला या आजारापासून लांब आणि सुरक्षित ठेवायचे. जेव्हा केव्हा भाजीपाला किंवा दुध,किराणा इत्यादीसाठी जावं लागलंच तर मास्क घालून जाणं आणि इतरांपासून social distancing अर्थात सुरक्षित अंतर ठेवावं.

आता महत्त्वाचे म्हणजे घरात बसून करायचे काय? तर जे लोक ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे घरी बसून त्यांचं काम करत आहेत, त्यांचा तर काही प्रश्न नाही. पण मग इतर लोकांनी काय करावं? मुलांनी काय करावं? मुलांचं म्हणाल तर बऱ्याच शाळांनी ऑनलाईन लेक्चर्स सुरू केले आहेत.पण इतरांचं काय?. तर मंडळी मला काय वाटतं आज आपलं आयुष्य अक्षरशः थांबलं आहे. काय करावं काही सुचत नाहीय. किती दिवस असं घरी बसून राहणार?. टीव्हीवर किंवा पेपरमध्ये किंवा मोबाईलवर व्हाट्सऐपच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून कोरोना आणि त्याच्यामुळे होणारे जगभरातील आणि आपल्या देशातील मृत्यू. सगळी आकडेवारी बघून मन दुःखी होतं, चिंता वाढत जाते. दुसरं काही करावं तर मन कशातच रमत नाही. घरातील इतर लोकांवर चिडचिड होते.

पहिली गोष्ट जी करायची ती म्हणजे आजपासून कोरोना विषयक बातम्या बघणं आणि वाचणं एकदम बंद करावं. ती आकडेवारी पाहिली नाही तरी आपलं काहीही अडत नाही. आपण बघितल्यानं आकडा काही कमी जास्त होत नाही. आपण जर नीट काळजी घेतली तर आपल्याला हा आजार होणार नाही ह्याची पक्की खात्री मनात असू द्या. नकारात्मक विचार आजपासून बंद करून फक्त सकारात्मक विचार करावा.

मला कधीच वेळ मिळत नाही म्हणून मला बऱ्याच गोष्टी करता येत नाहीत ही आपली तक्रार असते ना?. अहो मग आता आपल्याकडे खूप वेळ आहे. तेव्हा
सगळ्या गोष्टींची यादी करा आणि एकेक करायला घ्या. अर्थात घरातल्या घरात जे करता येईल तेच. थोडक्यात आपला छंद आता जपा आणि आनंदी रहा.

नक्की काय आणि कसं करावं ?

रोज सकाळी तुम्हाला जर वॉकिंगची सवय असेल आणि ती बुडत आहे असं वाटत असेल, तर घराच्या टेरेसवर जाऊन 45 मिनटं वॉकिंग करा. नसेल तर घराच्या कंपाऊंडमध्ये करा. दोन मजली असेल तर पायऱ्या खाली वर करा,घरातल्या घरात चाला 45 मिनटं. सूर्यनमस्कार घाला. जेवढे जमतील तेवढे. कमीत कमी 12 तरी. योगासने करा. गाणी लावून त्यावर झुंबा डान्स करा. थोडक्यात दिवसातून 2 तास तुम्ही शारीरिक व्यायाम करण्यासाठी द्या.

आता शारीरिक फिटनेस सांभाळून आपल्याला मानसिक फिटनेस ह्या काळात जास्त महत्वाचा आहे. त्यासाठी काही प्रार्थना आणि ध्यान करावं. मनशक्ती केंद्र लोणावळा तर्फे काही अत्यंत सुंदर प्रार्थना सांगितल्या आहेत. रोज सकाळी ७.५८ला कर्मशुद्धीची प्रार्थना, संध्याकाळी ७.३० ला प्रकाश प्रार्थना आणि लगेच दिव्याच्या ज्योतीवर ध्यान करणे. आत्मचिंतन प्रार्थना, राष्ट्र कल्याण प्रार्थना, सध्याचं संकट हे संपूर्ण जगावर आहे. तेव्हा त्यासाठी संध्याकाळी ६.५५ ला विश्व कल्याण प्रार्थना.रोगमुक्तीसाठी पेशींची प्रार्थना, सकाळी किंवा संध्याकाळी गायत्री मंत्र पठण करावं, (कमीत कमी 12 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा) पण त्याचा अर्थ समजून म्हणावा, (ज्याप्रमाणे सूर्य स्वतः जळत राहून सगळ्या जगाला प्रकाश देतो, तसं वागण्याची बुद्धी मला दे हा अर्थ आहे गायत्री मंत्राचा).

थोडक्यात प्रत्येकाने फक्त स्वार्थी न राहता थोडा तरी नि:स्वार्थ आपल्या आयुष्याला जोडावा. आज आपण संकटात आहोत, पण आपल्या पेक्षा जास्त प्रमाणात दुःखात काही लोक आहेत. त्यांना आपल्याला घरी राहूनच कशी मदत करता येईल ते बघावे. जसं टाटा समूहाने आणि देशातील अनेक लोकांनी आणि संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कारण दुसऱ्या लोकांच्या दुःखात सहभागी झाल्यानं आपलं स्वतःचं दुःख आपोआप कमी होतं आणि आपलं मन शांत आणि आनंदी राहतं. अहो अगदी सोपी मदत. तुमच्याकडे कामाला येणाऱ्या बाई जर सध्या येत नसतील तरी त्यांना महिन्याचा पगार द्या, झालं की सत्कृत्य.

आता ध्यान, दोन प्रकारचे 10 -10 मिनटं ध्यान रोज करावे. संध्याकाळी ७.३०ला वर सांगितले त्याप्रमाणे प्रकाश प्रार्थना झाली की ७.४२पर्यंत ज्योतीध्यान करावे. सकाळी स्नान झाल्यावर 10 मिनटं जे ध्यान करायचे आहे, त्यात दोन ते तीन प्रकार आहेत. त्यापैकी कुठलंही एक ध्यान करावं. शरीराशी संवाद किंवा श्वास ध्यान किंवा ओंकार ध्यान. (ह्यासाठी कृपया आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर वर जाऊन ‘मन तरंग app डाउनलोड करावे आणि त्यातील ऑडीओ प्रकारातील आपल्याला हवी ती ध्यानाची सिडी डाउनलोड करावी. रोज सकाळी ती मोबाईलवर लावून ऐकावी आणि ध्यान करावे.)

आहार सकस घ्यावा,आणि जेवढी भूक आहे तेवढाच घ्यावा. आता मघाशी सांगितल्याप्रमाणे आपला इतर वेळ कसा घालवावा. तर वाचन करावं, घरात उपलब्ध असलेली पुस्तकं किंवा सध्या बऱ्याच पुस्तकांची सॉफ्टकॉपी PDF मध्ये उपलब्ध आहे,ती पुस्तकं वाचावी. वर्तमानपत्र वाचू शकता,अर्थात त्यातील कोरोना संबंधित बातम्या वगळून. वाचनाचा कंटाळा असेल तर ऑडीओ बुक्स असतात ती ऐका, मनशक्तीच्या मन तरंग app वर श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत,त्या ऐका.

संगीत ऐका, जी तुम्हाला आवडतात ती. जुनी, नवीन, सगळी ऑनलाईन उपलब्ध आहेत. संगीतामध्ये प्रचंड ताकद असते. तुमचा मूड अक्षरशः बदलवून टाकतं. काही वाद्य असेल घरात तर ते वाजवा. गाणी म्हणा,डान्स करा, चित्रं काढा,त्यात रंग भरा,अभिनय करा,शिल्प बनवा, स्वयंपाक ज्यांना येत नसेल त्यांनी ती कला शिका. येत असेल तर त्यात नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या रेसिपीज बनवा. बाग असेल तर झाडांना पाणी द्या. तिथे मशागत करा, तिथे वेळ घालवा,पुरुष मंडळीने घरातील कामात मदत केली तर तेवढाच तुमच्या पत्नीला आनंद होईल.

टीव्ही बघा, अहो सध्या रामायण पुन्हा दाखवत आहेत, ते अवश्य बघा. खूप काही शिकण्यासारखं आहे. श्रीराम थोडक्यात देव जेव्हा मनुष्य जन्माला आला तेव्हा त्याच्या वर अनंत संकटं आली, पण धैर्याने प्रत्येक संकटाचा सामना करत प्रभू श्रीराम जिंकले. इतर जे तुम्हाला आवडतात ती चॅनल्स आणि त्या मालिका बघा, सिनेमाची आवड असेल,तर सिनेमे बघा. ऑनलाईन, वेबसिरीज इत्यादी बघता येतील.

मुलांना कार्टून्सची सवय असेल तर मनशक्ती च्या मनतरंग app वरील अनिमेशन cds बघायला द्या. चांगला संस्कार आणि खेळ दोन्ही साध्य होतील.  बाकी घरात खेळता येतील असे बरेच खेळ आहेत. पत्ते, कॅरम, बुद्धीबळ, अंताक्षरी, Dumb Charades, क्वचितच मोबाईल किंवा कॉम्प्युटर गेम्स हरकत नाही. पण प्रमाण कमी असावं, ह्या व्यतिरिक्त घराची साफसफाई आहे,ती आपण करू शकतो.

जुने फोटो अल्बम काढून फोटो बघणं आणि त्यातील आठवणीत बराच वेळ जाईल. आपल्या कुटुंबातील सदस्य ह्यांच्या सोबत एकत्र वेळ घालवायला खरं तर आपल्याला आतापर्यंत वेळ मिळालाच नव्हता, मग हे चांगलं निमित्त आहे की नाही?. मग बोला एकमेकांशी, गप्पा मारा, मनातलं सगळं बोला, आणि त्याच वेळी आपल्या माणसाचं म्हणणं ऐका सुद्धा. ते आपण बऱ्याच वेळा करत नाही, ऐकतच नाही,ते ऐकून घेऊया. एकमेकांना समजून घेऊया. एकमेकांवर प्रेम करूया आणि आहे ते प्रेम व्यक्त सुद्धा करूया. कारण ते आपण फक्त गृहीत धरत असतो,बोलून दाखवत नाही. तर थोडं व्यक्त सुद्धा करूया.

थोडक्यात सांगायचे म्हणजे दिवस कसा उगवला आणि कसा संपला तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ह्या निमित्ताने आत्मपरीक्षण करूया. स्वतःशी सुद्धा संवाद साधुया. पुढील आयुष्यात अजून काय करायचे आहे त्याचं नियोजन करूया. थोडक्यात हे आपल्यावर जे संकट आलं आहे त्याच्या मुळे आपलं सामर्थ्य वाढणार आहे. निसर्गानं आपल्या विरुद्ध केलेला चांगला कट म्हणजे संकट असं मनशक्तीचे पूज्य स्वामी विज्ञानानंद ह्यांनी सांगितले आहे. संकट ही संधी समजून आपलं सामर्थ्य वाढवावं. हे संकट सुद्धा टळेल. काही दिवस किंवा कदाचित काही महिने राहील. पण आपण त्याला धैर्याने सामोरं जाऊन जिंकणार आहोत.
एकच करूया मनानं शांत आणि शरीरानं खंबीर राहून आपण हा सध्याच्या कठीण प्रसंगाला तोंड देऊया. आणि लवकरच ह्यातून आपण सुखरूप बाहेर पडुया अशी प्रार्थना करूया.

विश्वकल्याण प्रार्थना

विश्व कल्याण मेरा मंत्र है,
आत्म परीक्षण मेरा तंत्र है,
बाहर मेरा कोई दुश्मन नहीं,
अंदर कुछ शत्रू जरूर सही,
दिन दिन मेरा ग्यान कर्म बढेगा,
तो इक दिन सब जग मेराही बनेगा,
विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है,
कृतज्ञता मेरा धर्म है,
पर निंदा मेरा वर्म है,
शांती समता मेरा कर्म है!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.