Chikhali: हवी ती औषधे मिळतील, पण शिस्त पाळा, गर्दी करू नका!

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह धरण्यात येत असला तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अतिउत्साही मंडळींनी जमावबंदी व संचारबंदीची देखील ‘ऐशी की तैशी’ करून टाकलेली असतानाच शहरातील काही दुकानदारांनी मात्र जबादारपणाचे दर्शन घडवत चांगले उदाहरण घालून दिले आहे. आपल्याला हवा ती औषधे  मिळतील, पण त्यासाठी शिस्त पाळा, गर्दी करू नका, असे आवाहन करीत ग्राहकांना आरोग्याचा कानमंत्र दिल्याचे पाहायला मिळाले.

चिखली कृष्णानगर येथील स्पाईन रोड कॉर्नर येथील श्रीयश मेडिकल स्टोअर हे त्याचे उत्तम उदाहरण होय. दिवसभर मंडई व किराणा मालाच्या दुकानांमधील झुंबड पाहून मन विषण्ण झालेले असतानाच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत रांगेत ग्राहक औषधे घेत असल्याचे सुखद दृष्य या ठिकाणी पाहायला मिळाले. दोन ग्राहकांमध्ये एक मीटरपेक्षाही जास्त अंतर असलेली रांग या दुकानापुढे पाहायला मिळाली. ग्राहक देखील घाई गडबड न करता शांतपणे शिस्तीत औषधे घेत होते. शिस्तीमुळे प्रत्येकाचाच नंबर लवकर येत होता.

कोरोना हा संसर्गजन्य आजार अजून त्यापासून दूर राहण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये एक मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर राखणे गरजेचे आहे, असे आवाहन वारंवार करूनही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. दुकानदार देखील दुकानात चांगली गर्दी होऊन कमाई चांगली होत असल्याने जबाबदारीकडे कानाडोळा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीयश मेडिकल स्टोअरने सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याबरोबरच ग्राहकांनाही कोरोना संसर्गापासून दूर राहण्याचा संदेश देऊन चांगले उदाहरण घालून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.