Pimpri : नव्या सरकारकडून तरुणाईला मोठ्या अपेक्षा…

(गौरव चौधरी)

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभर अनेक नाट्यमय घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने विधानसभेत बहुमत देखील सिद्ध केले आहे. आता या सरकारकडून अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत. तरुणाईला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात जसा शेतकरी, व्यापारी, मजूर याप्रमाणे तरुण हा देखील केंद्रित मानून त्यासाठी काम करण्यास सरकारने बांधील रहावे.

सध्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे राज्यातला तरुण हा चिंतेत आहे. मागच्या काही वर्षात जे काही मोठे उद्योग हे अन्य राज्यात गेले आहेत. ते परत महाराष्ट्रात आणावे किंवा नवीन मोठे प्रकल्प हे राज्यात विविध ठिकाणी निर्माण करावे. त्या ठिकाणी भूमीपुत्रांना नोकरी देण्यात यावी असे प्रायोजन करणे गरजेचे आहे. आज राज्यात बेरोजगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढती आहे. अनेक दिवसांपासून मेगाभरती थांबली आहे. त्या सरकारी रिक्त पदांची भरती त्वरित काढून अनेक तरुणांना व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा मिळावा ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आयटी सेक्टरमध्ये जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आणून नवीन प्रोजेक्ट आणले पाहिजेत.

उत्तीर्ण झाल्यानंतर देखील मागच्या काही वर्षापासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृती अजुनही मिळाली नाही. रखडलेली शिष्यवृती त्वरित खात्यात जमा व्हावी ही विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. ज्या सरकारच्या महापोर्टलमुळे अनेक परीक्षार्थींचे नुकसान झाले आहे. ते बंद करणे हे अपेक्षित आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे अशी देखील कॉलेज तरुणाची अपेक्षा आहे.

नाविन्यपूर्ण रिसर्चसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात तरतूद करावी अशी त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबाचे खुप हाल होत आहेत. सरकारने त्या कुटुंबातील मुलांचे येणा-या परीक्षेचे परीक्षा शुल्क देखील माफ़ करावे. राज्याचा विद्यार्थी आणि तरुणांचे महत्वाचे प्रश्न आहेत ते सरकार मार्गी लावेल ही अपेक्षा आहे. विद्यार्थी आणि तरुणांचे हीत जोपासणे यातच राज्याची आणि देशाची प्रगती आहे. नवीन सरकारला मन:पूर्वक शुभेच्छा…

(लेखक पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसचे प्रवक्ते आहेत)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.