Pimpri: ‘तुमच्या ओळखीचा अर्थमंत्री आहे’; कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही’

अजितदादांचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना आश्वासन : 'Your acquaintance is the Finance Minister'; Corona will not let funding for measures dwindle '

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही. ‘तुमच्या ओळखीचा अर्थमंत्री आहे, कोरोनासाठी निधी कमी पडू देणार नाही’, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निधी देण्याची विनंती केली होती. दादांनी अधिकारी, पदाधिका-यांच्या गराड्यात असतानाही लांब थांबलेल्या भापकर यांना बोलावून घेऊन निधी देण्याची ग्वाही दिली.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकत्रितपणे नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.

त्यासाठी राज्य सरकार 50 आणि अन्य चार संस्था 50 टक्के निधी देत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.7) शहरात आले होते.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, ऑक्सिजन बेडची कमतरता याकडे दादांचे लक्ष वेधले.

तसेच नेहरुनगर येथील सेंटरला राज्य सरकार मदत करत आहे. हे चांगले आहे. पण, लॉकडाउनमुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.

त्यामुळे कोरोनासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांना देखील मदत करण्याची मागणी भापकर यांनी केली. त्यावर ‘थोड्यावेळाने तुम्हाला बोलवतो’, असे दादांनी भापकर यांना सांगितले.

कोविड रुग्णालयाची पाहणी करुन जाताना अजित पवार निवेदन वाचत होते.त्यांच्याजवळ अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडा होता. त्यावेळी लांब थांबलेल्या भापकर यांना श्री पवार यांनी बोलावून घेतले.

‘कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे. पालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही. तुमच्या ओळखीचा अर्थमंत्री आहे, कोरोनासाठी निधी कमी पडू देणार नाही’, अशी ग्वाही श्री पवार यांनी भापकर यांना दिली.

‘हाच’ भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील विशेष फरक – भापकर

”कोरोनाच्या उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निधी देण्याबाबतचे निवेदन देऊन मी लांब थांबलो होतो. अधिकारी, कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना अजितदादांनी मला बोलावून घेतले. ‘तुमच्या ओळखीचा अर्थमंत्री आहे. निधीचा कमतरता भासू देणार नाही’, असे आश्वस्त केले.

यापूर्वी भाजप सरकार असताना देखील आम्ही लोकहिताचे प्रश्न मांडण्यासाठीचे निवेदने देत होतो, आंदोलनाचा प्रयत्न करत होतो. पण, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी शहरात येत असत. त्याच्या एकदिवस अगोरदच पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला नजरकैदेत ठेवले जात होते.

आता निवेदन द्यायला गेलो.  लांब उभा असतानाही अजितदादांनी बोलावून घेऊन  आमच्या निवेदनाची दखल घेतली. हाच भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील विशेष फरक दिसून येत असल्याचे” मारुती भापकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.