Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून पोलीस चौकीत तरुणाला बेदम मारहाण; चौकीतही तोडफोड

एमपीसी न्यूज – पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला सराईत गुन्हेगाराने बेशुद्ध होईपर्यंत पोलिसांच्या समोरच मारहाण केली. तेवढ्यावरच तो थांबला नाही तर डोके आपटून त्याने पोलीस चौकीतील खिडकीची काचही फोडली. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी संत तुकारामनगर पोलीस चौकीत घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथे धुळवडीदरम्यान रविवारी दुपारी काही तरुणांची भांडणे झाली. भांडणानंतर दोन्ही गटातील तरुण संत तुकाराम नगर पोलीस चौकीत आले. पोलीस तक्रार घेत असताना सागर वडमारे नावाच्या सराईत गुन्हेगाराने तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणास पोलिसांच्या समोरच चौकीत मारहाण केली. या मारहाणीत तो तरुण बेशुद्ध पडला. त्या तरुणाला तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Pimpri: पोलिसांसमोर भर चौकात मद्यपींची गुंडगिरी

दरम्यान पोलिसांनी आपल्यावर काही कारवाई करू नये, म्हणून त्या वडमारेने पोलीस चौकीतच गोंधळ घालण्यास सुरवात केली. पोलीस चौकीतील खिडक्यांच्या काचावर डोके आपटले अन काच फोडली. त्याला अडविण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही त्याने धक्‍का-बुक्‍की केली. हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची लक्षणे दिसून आल्याने पोलिसांनी जादा कुमक मागवली. अखेर गोंधळ घालणाऱ्या त्या तरुणाला पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर कारवाईच्या भीतीने चौकसमोरील जमाव पांगला.

 

शहरात पोलीसच असुरक्षित

 

दोन दिवसांपूर्वी पाणी पिण्यासाठी आलेल्या एकाने संत तुकाराम नगर पोलीस चौकीतील पोलिसांशी हुज्जत घातली. फुटलेली काच घेऊन तो पोलीसाला मारण्यासाठी आला. त्याच्या हातातील काच टाकून दिल्यावर तो दगड घेऊन पोलिसाला मारण्यासाठी आला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात पोलिसच असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.