Pimpri : न्यायालयाच्या आवारात गाडी पार्क करण्यावरून वकील आणि पोलिसात वाद; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वकिलावर गुन्हा

Dispute between lawyer and police over parking of vehicle in court premises; Crime against a lawyer for obstructing government work

एमपीसी न्यूज – न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरून पोलीस आणि वकील यांच्यात खडाजंगी झाली. वकिलाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून धमकावले. पिंपरीतील मोरवाडी न्यायालय परिसरात शुक्रवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका वकिलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश चौधरी (वय 45, रा. मधुबन सोसायटी, सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप मारुती बर्गे (वय 39) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याची दुचाकी न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये पार्क करण्यासाठी आणली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला थांबविले. तुम्हाला न्यायालयात पूर्णवेळ थांबायचे असेल तरच दुचाकी आतमध्ये पार्क करा, अन्यथा बाहेर पार्क करा, असे फिर्यादी म्हणाले.

यावर ‘माझे कोर्ट आहे, मी कोठेही गाडी लावीन आणि आता गाडी येथेच लावणार, तुम्ही काय करता ते बघतो’, असे म्हणून आरोपी वकिलाने गाडी तेथेच पार्क केली. त्यावेळी गेटवर असलेल्या रजिस्टरमध्ये नाव व मोबाइल क्रमांक लिहिण्यास फिर्यादी यांनी सांगितले. त्यालाही आरोपी याने नकार दिला.

त्यावर ‘तुम्हाला रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय आत जाता येणार नाही’, असे फिर्यादी यांनी सांगितले. त्यानंतर आरोपी याने शिवीगाळ केली. मला शिवी का दिली, असे फिर्यादी यांनी विचारले असता मारण्यासाठी आरोपी फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला.

‘तुम्हाला मी उद्यापर्यंत जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपी याने फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचा-यास दिली. त्यानंतर आरोपी त्याची दुचाकी घेऊन तेथून निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.