Pimpri: नगरसेवकांचे फोन न घेणे पडले महागात; शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिका-यांना सक्त ताकीद

एमपीसी न्यूज – स्थायी समिती सभेला दांडी आणि नगरसेवकांचे फोन न घेणे पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिका-यांना चांगलेच महागात पडले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना सक्त ताकीद दिली आहे. तसेच यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाशी संबंधित विषय 19 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले होते. त्यामुळे विभागप्रमुख म्हणून शिंदे यांची स्थायीच्या सभेला उपस्थित राहणे जबाबदारी आणि कर्तव्य होते. मात्र, 19 डिसेंबरच्या स्थायी समितीच्या सभेला त्या उपस्थित राहिल्या नसल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. याशिवाय ज्योत्स्ना शिंदे या नगरसेवकांचे फोन उचलत नसल्याची बाब देखील निदर्शनास आली. त्यामुळे शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.

  • आजपर्यंतच्या स्थायी समितीच्या सर्व सभांना हजर राहिले आहे. शासनाकडील दुसरी सभा अथवा बैठक असल्यास नाईलाजास्तव स्थायी समितीच्या सभेस हजर राहणे शक्य होत नाही. तसेच पदाधिकारी, नगरसेवक यांचे भ्रमणध्वनी स्वीकारण्याबाबत दक्षता घेण्यात येईल, असा खुलासा शिंदे यांनी केला होता. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हा खुलासा संयुक्तिक वाटला नाही. स्थायीच्या सभेत अनुउपस्थित राहणे आणि सन्मानीय सदस्यांचे दूरध्वनी न स्वीकारणे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम 1979 मधील नियम 3चा भंग करणारी आहे.

खुलासा संयुक्तिक नसल्याने एकवेळ संधी म्हणून महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 56 (2)अ चे अर्थांतर्गत तरतुदीनुसार प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापुढे कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना कर्तव्यतत्परता आणि सचोटी न आढळल्यास अथवा कर्तव्यात कसूर केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.