Pimpri : लोकसंख्यावाढ, वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – लोकसंख्यावाढ, वाढती वाहने, वाढते उद्योगधंदे यामुळे पर्यावरणावर ताण येऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) यांच्यातर्फे वनराई संस्थेच्या सहकार्याने चिंचवड, ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, संमेलनाचे विशेषा.ध्यक्ष टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, स्वागताध्यक्ष डॉ. अभय कुलकर्णी, आयोजक विकास पाटील, प्रदीप वाल्हेकर, निलेश लोंढे, धनंजय शेडबाळे, विठ्ठल वाळुंज, मकरंद टिल्लू, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, पर्यावरण संवर्धनाची गरज, उपाय विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत आणि पोवाड्यातून स्पष्ट केले.

महापौर ढोरे म्हणाल्या, “पर्यावरण शब्द वाचला तरी लोकांना पर्यावरण संकल्पना लक्षात येते. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नदीपात्रातील वाढती जलपर्णी चिंतेचा विषय आहे. त्याचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो”

संमेलनाचे विशेषाध्यक्ष मनोहर पारळकर म्हणाले, “आज एसी ही गरज बनली आहे. याला वेळीच आवर घातला नाही. तर, आपण पुढच्या पिढीचे मारक ठरणार आहोत. ऐशोरामी गोष्टींचा उपयोग कमी करण्याची गरज आहे. साधं जीवन जगणे ही काळाची गरज आहे. तरच चांगले दिवस येतील. स्वतःपासून सुरुवात केली तरच पर्यावरण रक्षण शक्य आहे”

मकरंद टिल्लू यांनी सांगितले, की आतापर्यंत लोकांना हसवता हसवता गळके नळ दुरुस्त करून शंभर कोटी लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचवले आहे. जिथे त्रास सुरू होतो, तिथे उपाय सुचतात. या कल्पनेने पाणी वाचवले. आज शहरात पाण्याबाबत जनजागृती करीत असताना आम्ही ग्रामीण भागातील गळके नळ दुरुस्ती करून जनजागृती करीत आहोत. कारण आपण आईच्या पोटात असल्यापासून आपला पाण्याशी संबंध आहे. त्यामुळे पाणी वाचविले, तरच पर्यावरण वाचेल.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “आपली घरे स्वच्छ ठेवताना बाहेरचा परिसर अस्वच्छ करतो, हा मोठा पर्यावरणीय वाद आहे. वाडा संस्कृती नष्ट होणे, हाही पर्यावरणाचा ऱ्हास आहे. पर्यावरण रक्षण एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. हा अंतर्विरोध वाढत आहे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी विरोध हा होतच असतो. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. जगण्यायोग्य शहरे घडवायची असतील, तर अंतर्विरोध स्वीकारावा लागेल”

प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉ. अभय कुलकर्णी यांनी केले. तसेच पर्यावरण साहित्य संमेलनामागील भूमिका स्पष्ट करीत पर्यावरण रक्षणासाठी अनेकांनी पुढे येण्याची आवश्यकता बोलून दाखवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.