Pimpri: ‘कोविड’च्या आरक्षित बेडची परिपूर्ण माहिती द्या, रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करा – योगेश बाबर

Give full information about the reserved beds of 'Kovid', take action against the hospital which is extorting patients - Yogesh Babar

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने कोविड -19 संदर्भात सारथी ॲप आणि संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती नागरिकांसाठी अपुरी, अपारदर्शक आणि निरुपयोगी आहे. रुग्णालय शोधताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी. खासगी रुग्णालयाकडून नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा खासगी रुग्णालयावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे.

याबाबत बाबर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरामध्ये कोविड -19 चा प्रसार झपाट्याने वाढत असताना नागरिकांना तपासणी, विलगीकरण, रुग्णालयात बेड्स व आयसीयूची उपलब्धता या संदर्भात महापालिकेच्यावतीने मीडिया, सारथी ॲप आणि संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती नागरिकांसाठी अपुरी, अपारदर्शक आणि निरुपयोगी आहे.

या माहितीच्या आधारे रुग्णालय शोधताना नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः खासगी रुग्णालयाकडून नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

कोविड-19 संदर्भातील पालिकेकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी अधिक तपशीलवार हवी. तपासणी, विलगीकरण, कोविड -19 रुग्णालयातील बेड्सचे व्यवस्थापन (उपलब्धता) अशी सर्व माहिती रियल टाइम उपलब्ध व्हायला हवी.

या संदर्भातील मुंबई महापालिका प्रदर्शित करीत असलेला माहितीचा आधार घ्यावा. त्यानुसार पालिकेने माहिती द्यावी, असे बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.

मुंबई, पुणे पालिकांच्या धर्तीवर, 24 तास कोविड – 19 हेल्पलाईन पालिकेतर्फे सुरु करावी. तपासणी, विलागीकरण, रुग्णवाहिका, रुग्णालय उपलब्धता अशा प्रत्येक विषयास समर्पित हेल्प लाईन नंबर सुरु करण्यात यावा. कोविड 19 विरोधात लढाई फक्त लोकसहभागातून जिंकू शकतो.

त्याकरिता नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळण्याकरिता, त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि योग्य वेळी उपचार मिळावेत, याकरिता जिथे जिथे सुधारणा करण्याची गरज आहे . तसेच इतर पालिका ज्या परिणामकारक उपाय योजना करीतआहेत.

त्या तत्परतेने आत्मसात करीत नागरिकांना या संकट काळात त्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी अपेक्षा बाबर यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.