Pimpri: शहर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात; यापुढे रुग्ण वाढणार, सतर्कता बाळगा – आयुक्त हर्डीकर

In the early stages of the city of Corona; patients incrasing , be careful - Commissioner Hardikar

झोपडपड्या, गावठाण भागात रुग्ण वाढण्यास सुरुवात; कोरोना  पुढील सहा महिने राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आत्तापर्यंत रुग्ण संख्येची वाढ मर्यादित होती. आता लॉकडाउन उठला आहे. नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील झोपडपट्या, गावठाण आणि दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 10 ते 12 दिवस लागत आहेत.  त्यानुसार महिनाअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता आहे. कोरोना  पुढील सहा महिने राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. तसेच महापालिका यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महासभेत आयुक्त हर्डीकर यांनी शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

आपण कोरोनातून बाहेर पडलो असल्याचे मनातून काढून टाकावे, असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले,  शहरात सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा कमी प्रादुर्भाव झाला. लॉकडाउन शिथिल केल्यापासून रुग्ण वाढ सुरु झाली आहे. झोपडपट्या, गावठाण भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

पॉझिटीव्ह रुग्णांवर तत्काळ उपचार सुरु केले जात आहेत. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील रुग्णांची आवश्यकेनुसार तपासणी केली जाते. त्यांना  होम क्वारंटाईन केले जाते.

तर, होम क्वारंटाईन शक्य नसणा-यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. नागरिक क्वारंटाईन होण्यास नकार देतात. लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेतल्यावर क्वारंटाईन होतात. त्यासाठी लोकप्रतिनीधींनी मदत करावी.

पॉझिटीव्ह असलेल्या 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. आत्तापर्यंत रुग्ण वाढ मर्यादित होती. यापुढे रुग्ण वाढत जाणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 10 ते 12 दिवस लागत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार महिनाअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित केले आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांचा भार वायसीएमने उचलला आहे.

वायसीएममध्ये पाच टक्के रुग्ण आयसीयूमध्ये ठेवू शकतो. दोन हजार रुग्ण झाल्यास 100 रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवावे लागेल. वायसीएममध्ये 92 बेड उपलब्ध आहेत.

गरोदर महिलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यांच्यासाठी 80 बेडचा वॉर्ड आरक्षित केला आहे. बाधित लहान मुलांची देखील संख्या वाढत असून त्यासाठी वॉर्ड सज्ज ठेवला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी भोसरी रुग्णालय तयार ठेवले आहे.

पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात 120 बेड तयार आहेत. ऑक्सीजनची आवश्यकता भासत आहे. त्याची भोसरी, जिजामाता रुग्णालयात महिन्याभरात तयारी करणार आहोत. नर्स, वॉर्डबॉय हे वाढीव मनुष्यबळ उपलब्ध केले आहे.

नॉन कोविड रुग्णांसाठी वायसीएमएच लगतच्या डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाशी करार केला आहे. तिथे महापालिकेचा टेबल ठेवला असून काही कर्मचारी देखील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.  तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तिथे चोवीस तास नियंत्रण कक्ष करणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

जोखमीच्या डिलेव्हरीच्या महिलांसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात 30 बेडची व्यवस्था केली आहे. 30 संख्येने रुग्ण तिथे पाठवू शकतो. शहरातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड नियंत्रित करण्यात आले आहेत. या रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी  किती रक्कम आकारावी यावर राज्य सरकारने आदेश दिले आहेत.

त्यानुसार शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आदेश दिले आहेत. 80 टक्के बेडचे दर निश्चित केले आहेत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.