Pimpri: निविदा कार्यवाही थांबल्याने वाढीव खर्चाच्या विषयांचा सपाटा;मैला वाहतुकीसाठी 16 लाखाचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्रभागातील मैलाशुद्धीकरण केंद्रातील मैल्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतुक करण्यात येते. सध्या कोरोनामुळे निविदा कार्यवाही थांबली असल्याने मैलाशुद्धीकरण केंद्रातील मैला वाहतुकीचे काम बंद आहे. या कामाची आवश्यकता लक्षात घेऊन पुर्वीच्याच ठेकेदाराला मंजुर केलेल्या 84  लाख रूपये खर्चामध्ये 16  लाख रूपये वाढीव खर्च समाविष्ट करून 1 कोटी 51 हजार रूपये सुधारीत खर्च करण्यात येणार आहे.  निविदा कार्यवाही  थांबल्याने वाढीव खर्चाच्या विषयांचा सपाटा  महापालिकेत सुरू झाला आहे.

महापालिकेच्या क, ड आणि ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मैला शुद्धीकरण केंद्रामधील मैल्याची (स्लज) वाहतुक करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2017 रोजीच्या आदेशानुसार, शुभम उद्योग या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे.

त्यांनी आजपर्यंत 99 टक्के काम पूर्ण केले आहे. या कामाअंतर्गत मैला शुद्धीकरण केंद्रामधील मैला केंद्रातून बाहेर नेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असते.

या कामात क, ड आणि ई क्षेत्रीय हद्दीतील दापोडी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे-निलख, च-होली येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील स्लजची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतुक करणे या कामाचा समावेश आहे. या कामास मुळ प्रशासकीय मान्यता दीड कोटी रूपये एवढी आहे.

या कामाच्या 83 लाख 98 हजार रूपये खर्चास स्थायी समिती सभेने 8 नोव्हेंबर 2017 रोजी मान्यता दिली आहे. अशा प्रकारच्या कामाची निविदा प्रक्रीया मे 2020 मध्ये राबवण्यात आली.

मात्र, कार्यवाही चालू असतानाच कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यातच तांत्रिक अडचणीमुळे निविदा कार्यवाही थांबली आहे.

अ, ब आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मैलाशुद्धीकरण केंद्रामधील मैला वाहतुक करण्याचे काम अंतिम करण्यात आले आहे. या कामाअंतर्गत रावेत, आकुर्डी, चिंचवड, भाटनगर आणि चिखली या मैलाशुद्धीकरण केंद्रांचा समावेश होता.

त्यामुळे या मैलाशुद्धीकरण केंद्रातील मैला वाहतुकीचे काम बंद आहे. महापालिका हद्दीतील लोकवस्तीतील मैलाशुद्धीकरण केंद्रातील मैला मोशी कचरा डेपोत नेणे आवश्यक आहे. त्यासाठी चालू काम सुधारीत करणे गरजेचे आहे.

नवीन कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत 30 जुलै 2020 पर्यंत हे काम चालू ठेवण्यासाठी सुधारीत खर्च 1 कोटी 51 हजार रूपये इतका येत आहे.  या कामासाठी महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात करण्यात येणा-या लॅण्डस्केपिंगच्या कामातील 25  लाखापैकी 14 लाख रूपये वळविण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या दापोडी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे-निलख, च-होली, रावेत, आकुर्डी, चिंचवड, भाटनगर आणि चिखली या सर्वच मैलाशुद्धीकरण केंद्रातील मैल्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतुक केली जाणार आहे.

या कामाची तातडीची आवश्यकता लक्षात घेऊन शुभम उद्योग यांना मंजुर केलेल्या 83 लाख 98  हजार रूपये खर्चामध्ये 16  लाख रूपये वाढीव खर्च समाविष्ट करून 1 कोटी 51 हजार रूपये सुधारीत खर्च करण्यात येणार आहे. या विषयाला महापालिका स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.