Pimpri: महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरीच अभिवादन करा; महापौरांचे आवाहन  

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व आदेश आणि सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी.  क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये. या महामानवांना घरात राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.  महामानवांनी देशासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करुन प्रत्येक नागरिकाने देशाप्रती असलेले आपले कर्तव्य आणि जबाबदारी निभावने हेच खरे महापुरुषांना अभिवादन असेल असेही त्या म्हणाल्या.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन या काळात करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने यावर्षी 11 ते 14  एप्रिल या दरम्यान साजरा होणा-या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पर्वाचे सर्व कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पुर्णत: टळल्यानंतर यावर्षी योग्य वेळ निश्चित करुन आगामी कालावधीत घेण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या प्रबोधन पर्वाच्या आयोजना संदर्भात आज शहरातील विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने महापौर ऊषा ढोरे यांची भेट घेतली. त्यानंतर महापौर ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रोकडे, दशरथ ठाणांबीर, एमआयएमचे प्रवक्ते धम्मराज साळवे, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, भीमशाही संघटनेचे शिवशंकर उबाळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, जनसेवा सोशल फाऊंडेशनचे अजय झुंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड, समता सैनिक दलाचे मनोज गरबडे, स्वराज प्रतिष्ठाणचे बापुसाहेब वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते प्रदोष जाधव आदि उपस्थित होते.

शहरामध्ये विविध ठिकाणी  मोठ्या प्रमाणावर दरवर्षी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये नागरिकांचा सहभाग मोठया संख्येने असतो. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी जयंतीचे जाहीर कार्यक्रम घेऊ नये यासाठी विविध संस्था संघटना आपापल्या पातळीवर आवाहन करीत आहेत.

महापालिकेच्या वतीने देखील विविध माध्यमातून नागरिकांना आवाहन करावे. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळा परिसराचे सुशोभीकरण आणि विद्युत रोषनाई महापालिकेने करावी आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने महापौर ढोरे यांच्याकडे केल्या.  मागण्यांची तातडीने पुर्तता करण्याचे आदेश महापौर ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. तसेच विविध सामाजिक संघटनांनीही विविध माध्यमांचा वापर करुन नागरिकांना याबाबत आवाहन करावे,  असे महापौर ढोरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.