Pimpri: महापालिकेतर्फे 2500 रुग्णांसाठी ‘क्वारंटाईन’ची सुविधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना ‘होम क्वारंटाईन’ची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन, आयसीयु वार्ड, नागरिकांना होम क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता महापालिका हद्दीतील खासगी, शासकीय वसतीगृहे, बालेवाडी स्टेडीयम अशा विविध ठिकाणी 2500 पेक्षा जास्त रुग्णांसाठी ‘क्वारंटाईन’ची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली.

ढाके म्हणाले, शहरातील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू वाटपाची गरज पडल्यास महापालिकेच्या आठही प्रभागाचे कार्यकारी अभियंता, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत स्वयंसेवी संस्थाना जोडून वस्तू वाटप व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी साखळी तयार करण्यात आली आहे. यापुढे शहरातील भाजी पाल्याच्या घाउक बाजार/मार्केट यार्ड बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी परिसरातील विविध शेतकरी संस्थांकडून थेट किरकोळ विक्रेत्यांपर्यंत भाजीपाल्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली जाईल.

राज्यात लागू केलेल्या कलम 144 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांची दहा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रभानिहाय एकूण आठ समन्वय पथके स्थापन करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकामध्ये महापालिकेकडील पथक प्रमुख म्हणून अतिक्रमण विभागातील अभियंता, त्यांच्यासह तीन होमगार्ड, तीन पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलिसांकडील पथक प्रमुख म्हणून एक सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तीन पोलिस कॉन्स्टेबल असणार आहेत. या पथकांमार्फत संपूर्ण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक तो प्रतिबंध केला जाणार आहे.

शहरातील विविध मोठया कंपन्या किंवा कंपन्यांचे सीएसआरच्या माध्यमातुन रुग्णालयांना कमी पडणारी व आवश्यक उपकरणे व्हेन्टीलेटर, पीपी N- 95 मास्क असे आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा व महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या डॉक्टरांच्या कमतरतेचा विचार करुन शहरातील खासगी डॉक्टरांनी कोरोना सदृश किंवा सर्दी, खोकला, ताप असणा-या रुग्णांवर त्यांचेच दवाखाना/रुग्णालयात उपचार देण्याबाबत स्वयंस्पूर्तीने सकारात्मक्ता दर्शविलेली आहे.

त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देणा-या सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांस पोलीस प्रशासनाने योग्य ते संरक्षण देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.