Pimpri:’स्मार्ट सिटी’चे सर्वाधिकार आयुक्तांना देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

आयुक्तांचा नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमणाचा प्रयत्न असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी पालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, चौक, शाळा, इमारतीसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. आयुक्त स्वत:कडे सर्वाधिकार घेऊन नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहेत. याच्या माध्यमातून त्यांना लूट करायची आहे असा आरोप करत आयुक्तांना सर्वाधिकार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले.

साने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराबाबत कुठलाही धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असेल तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे महापालिकेची मान्यता घ्यावी लागते. प्रशासाने महासभेसमोर ठेवलेल्या विषयानुसार हा शहरातील मनपाच्या जागा,रस्ते,उद्याने,चौक व मनपाच्या मालमत्तांचा वापर करण्यासाठी एकदमच परवानगी देण्याचे अधिकार स्मार्ट सिटीच्या सीईओंना म्हणजे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहेत.

कायद्याने अशी एकदम परवानगी देता येते का ? एकदम परवानगी दिली आणि कंपनीने त्या मालमत्तेचा दुरुपयोग केला तर त्याला जबाबदार कोण ? तसेच एकदा या कंपनीस अधिकार दिले तर त्यांच्यावर महापालिकेचे नियंत्रण राहणार नाही. नगरसदस्य हे त्रिस्तरीय लोकशाहीचा पाया आहे. तसेच ते शहराचे विश्वस्त आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला सर्वाधिकार देण्यात येऊ नयेत. त्याऐवजी गरजेनुसार महासभेसमोर प्रस्ताव आणून रितसर महासभेची मंजुरी घेण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.

आयुक्तांना अधिकार देण्यास राष्ट्रवादी कॉग्रेसचा तीव्र विरोध असून सदरचा विषय फेटाळण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.