Pimpri: शिवसेना आमदाराला निमंत्रण देण्याचा महापालिकेला विसर; भाषणही रोखले !

सरकार केवळ भाजपचे नसून शिवसेनेचेही आहे; आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची नाराजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) झाले. परंतु, या कार्यक्रमाचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांना निमंत्रण देण्याचा महापालिकेला विसर पडला. कार्यक्रमात आमदार चाबुकस्वार हे भाषण करण्यासाठी उभा राहिले असताना त्यांना बोलून देखील दिले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर जसे प्रश्न मांडले तसे मला पण मांडायचे होते. मी देखील लोकप्रतिनिधी आहे; मात्र बोलू दिले नाही, हे अत्यंत चुकीचे असून सरकार केवळ भाजपचे नसून शिवसेनेचेही आहे, असे आमदार चाबुकस्वार म्हणाले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध विकासकामांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ई-भुमिपूजने’ झाली. त्यावेळी व्यासपीठावर फक्त भाजपाचेच पदाधिकारी होते. विरोधकांमधून पिंपरीतील शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार एकमेव उपस्थित होते. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी प्रलंबित प्रश्न मांडले. त्यावेळी शिवसेना आमदार चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांना मला दोन मिनिटे द्या, अशी विनंती केली. परंतु, त्यांना बोलू दिले नाही. मुख्यमंत्री म्हणाले, “पुण्यात कार्यक्रमाला जायला उशीर झाला आहे. आपले म्हणणे मला सांगा, मी भाषणात आपल्या प्रश्नावर बोलतो” मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चाबुकस्वारांचा उल्लेख करून शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा देणे, आणि एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

याबाबत बोलताना आमदार चाबुकस्वार म्हणाले, ”महापालिकेचा कार्यक्रमाचे मला निमंत्रण देण्यात आले नाही, हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाला आमदाराला निमंत्रण देण्याचा विसर कसा पडतो. कार्यक्रमात भाजपच्या आमदारांनी प्रश्न मांडले. मला देखील माझ्या मतदार संघातील प्राधिकरणाच्या साडेबारा टक्के परताव्याचा, एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचा होता. त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, सत्ताधा-यांनी मला बोलू दिले नाही. हे अतिशय चुकीचे आहे. मी देखील लोकप्रतिनिधी आहे. सरकार केवळ भाजपचे नाही, शिवसेनेचेही आहे. त्यामुळे मला बोलून देणे आवश्यक होते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.