Pimpri: राज्यपालांवर शेरेबाजी, विरोधी पक्षनेत्यांना एन्काऊंटरची धमकी; भाजपचा आरोप

दोनही आमदारांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – राज्यपालांवर होणारी असंवैधानिक शेरेबाजी चुकीची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आरोप करत माध्यमांची गळचेपी, सोशल मीडिया कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे आणि पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांनी निषेध केला आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या सर्व घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी देखील या दोघांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही निवेदन इ मेल करण्यात करण्यात आले आहे.

आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत काही जणांकडून जाणूनबूजून असंवैधानिक शेरेबाजी सुरू आहे. त्यामुळे सरकारकडूनच या पदाची गरिमा राखली जात नसल्याचे दिसत आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. विरोधी पक्षनेत्यांना धमक्या देणाऱ्यांवर कायदेशीर कडक करवाई करण्यात यावी. विरोधी पक्षनेत्यांबाबत असे घडत असेल, तर राज्यातील सर्वसामान्यांची काय अवस्था असेल याची जाणीव होते.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. थेट पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे देखील याच आठवड्यात एका पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेची स्थिती दर्शविणारे आहेत.

पोलिसांवर हल्ले होत असताना सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रमाणिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर नाहक बदनामी होत आहे. अशा प्रकारात गुन्हे दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी बदलीची मागणी करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. ही चिंता वाढविणारी बाब आहे.

दुसरीकडे राज्यात माध्यमांचीही मुस्कटदाबी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही, असा जागतिक आरोग्य संघटनेने निर्वाळा दिला आहे. तरी देखील राज्यात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यास बंदी आहे. ज्येष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्यावर मुंबईत जिवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांवर कारवाई होण्याऐवजी पत्रकार अर्नब गोस्वामी यांना पोलिसा ठाण्यात तब्बल साडेबारा तास बसवून ठेवून चौकशी करण्यात आली. एखाद्या मोठ्या गुन्ह्यांतही गुन्हेगाराची एवढी चौकशी केली जात नाही.

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर जमाव जमण्यास कारणीभूत ठरवून पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सरकारविरोधात लिखाण होऊ नये, कोणीही भूमिका मांडू नये, असा सरकारचा प्रयत्न दिसत आहे. त्याचप्रमाणे सरकारविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या नागरिकांवर खोटे गु्न्हे दाखल करणे, उचलून नेऊन मारहाण करणे, धमक्या देण्याचे प्रकार होत आहेत. सरकारने राज्यात एकप्रकारे आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.