Pimpri: गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत 

The city's water supply was cut off on Thursday evening, disrupted on Friday

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.28) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे संध्याकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही.

तर, शुक्रवारी (दि.29) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पवना नदीवरील  रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे  आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.28) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा संध्याकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही.

दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे  शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.29) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.