Talegaon Dabhade News : मिळकतकर भरण्यासाठी तातडीने सुविधा उपलब्ध करून दया : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेस मिळकतकर भरण्यासाठी तातडीने ऑनलाईन सुविधा व काही सवलती उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन आमदार सुनील शेळके यांच्याकडून  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेस देण्यात आले आहे.  

तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना निवेदन देताना आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी गोकुळ किरवे, नबीलाल आत्तार, योगेश मोरे उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांनी निवेदनात  म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. त्यातच 31 मार्चजवळ आल्याने चालू कर भरण्यासाठी देखील नगर परिषद कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

नगरपालिकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन करभरणा करण्याची सुविधा बंद असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव नगर परिषद कार्यालयात जाऊन तास न तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्याबाबत अनेक नागरिकांकडून माझ्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे ही शेळके यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होणे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना ऑनलाईन कर भरण्याची सुविधा तातडीने पुन्हा उपलब्ध करून द्यावी. तोपर्यंत नागरिकांना कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. नव्या मुदतीसाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारे विलंबशुल्क अथवा दंड आकारला जाऊ नये. असे ही निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे.

नगर परिषद कार्यालयात देखील कर भरण्यासाठी जास्त खिडक्या उपलब्ध करून नागरिकांच्या रांगा लागणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी.

कोरोनामुळे नागरिक सध्या आर्थिक अडचणीत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योग-व्यवसाय अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी सक्ती करणे मानवतेला धरून नाही. त्यामुळे परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून थकबाकीदारांनाही कर भरण्यासाठी पुरेशी मुदत वाढवून मिळावी तसेच काही प्रमाणात हप्त्यांनी थकबाकी भरण्याची सवलत द्यावी, अशी नागरिकांची मागणी असल्याने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन सहकार्य करण्याचे आवाहनही आमदार शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.