Pimpri News : तीन क्षेत्रीय कार्यालयात प्लॉगेथॉन मोहीम; एक हजार स्वयंसेवकांनी गोळा केला 20 टन कचरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क, फ, ह या तीन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रविवारी (दि. 15) ‘प्लॉगेथॉन मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत 947 स्वयंसेवक आणि पालिका तसेच संबंधित संस्थांच्या स्वयंसेवक, अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत 20.5 टन पेक्षा अधिक कचरा जमा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि “आपला परिवार सोशल फाउंडेशन” पुणे यांच्या सहकार्याने रविवारी सकाळी पिंपरी येथील एच ए मैदान येथे ‘प्लॉगेथॉन मोहिम’ राबविण्यात आली. यामध्ये सुमारे 8.5 टन कचरा संकलित करण्यात आला.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजीनवाल, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, लक्ष्मण साळवे, आपला परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुदाम शिंदे, उपाध्यक्ष अनिल शर्मा, सचिव अजित भालेराव, कार्याध्यक्ष किरण कांबळे, सहसचिव दत्तात्रय बोराडे, उद्धव वांजळे यांच्यासह 250 स्वयंसेवक, महापालिकेचे 70 कर्मचारी, बीव्हीजी ग्रुपचे कर्मचारी, डिव्हाईन संस्थेचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी आदी सहभागी झाले.

फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने स्पाईन रोडवर कुदळवाडी चौक ते कचरा संकलन केंद्रापर्यंत ‘प्लाॅगेथाॅन मोहिम’ राबविण्यात आली. त्यामध्ये एकूण 297 स्वंयसेवक तसेच महापालिका कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी एकूण 8 टन कचरा संकलित करण्यात आला. देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असून नागरी सहभाग वाढावा यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने प्लाॅगेथाॅन मोहिम राबवली जात आहे. महापालिकेने सुरू केलेल्या ‘स्वच्छाग्रह’ उपक्रमास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत झालेल्या प्लॉगेथॉन मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सिताराम बहुरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी आणि सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

जिल्हा रुग्णालय सांगवी परिसरामध्ये महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ‘प्लॉगेथॉन मोहिम’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 400 पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी 6 टनापेक्षा अधिक कचरा संकलीत करण्यात आला. शहराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शहर स्वच्छतेची चळवळ महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या ‘स्वच्छाग्रह’ उपक्रमास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत असून विविध संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत. परिसरातील नागरिक त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवून आपले योगदान देत आहेत.

शहर स्वच्छतेचा हा उपक्रम निरंतर सुरू ठेवण्यासाठी महापालिकेने आज विविध ठिकाणी कचरा संकलनासाठी प्लाॅगेथाॅन मोहिमेचे आयोजन केले होते. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत झालेल्या प्लॉगेथॉन मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव,आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे एजाज मुल्ला, विजय कुंभार तसेच विविध पदाधिकारी आणि सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.